मेहरून नाकाडे
रत्नागिरी : पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्याला व्यावसायिकतेची जोड देऊन उत्पन्नाचा मार्ग टिके (ता. रत्नागिरी) येथील गजानन सोना कांबळे व त्यांचा मुलगा प्रसाद याने निवडला आहे. खरीप हंगामात भात, नाचणी, तर बागायतीमध्ये आंबा, काजू लागवड करून उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय खतावर सर्वाधिक भर असून, आवश्यकता भासल्यासच ते रासायनिक, खते, कीटकनाशकांचा वापर करत आहेत.
गजानन कांबळे यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीचा मार्ग अवलंबला, वडिलोपार्जित तसेच काही जमिनी स्वतः खरेदी करून लागवड केली आहे. एकूण १५ एकर क्षेत्रावर पाचशे हापूस आंबा व चारशे काजूची लागवड केली आहे. काजू लागवडीसाठी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला चार या कलमांची लागवड केली आहे. गजानन यांनी टप्प्याटप्याने लागवड वाढवत नेली आहे. खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर भात लागवड, तर २० गुंठे क्षेत्रावर नाचणीची लागवड करत आहेत. भातासाठी पारंपरिक वाणासह विद्यापीठ प्रमाणित अधिक उत्पन्न देणाऱ्या वाणांची लागवड करीत आहेत. स्वतःच्या कुटुंबाला पुरेल इतका भात, नाचणी ठेवून उर्वरित धान्य विकत आहेत.
हापूस कलमांचे खत व्यवस्थापन साफसफाई, पाणी, कीटकनाशक व्यवस्थापन, काढणी, विक्री यासाठी गजानन स्वतः परिश्रम घेतात. आंबा काढल्यानंतर तो थेट ग्राहकांशी संपर्क साधून विक्री करतात. सुरुवातीला दर चांगला मिळतो. मार्केटमध्ये दर गडगडल्यानंतर थेट विक्री करतात. २५ वर्षांचा अनुभव असला तरी लागवड, खत, कीटकनाशके फवारणी व्यवस्थापनासाठी तांत्रिक मार्गदर्शन कृषितज्ज्ञ संदीप डोंगरे यांच्याकडून घेत आहेत.
सेंद्रिय खतांचा सर्वाधिक वापर
खतांचा अतिरेक वापर केल्यास उत्पादनांमध्ये त्याचे प्रमाण उतरते. अन्नातून मानवी शरीरात खते, कीटकनाशके काही प्रमाणात शरीरात जातात. याचा आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे कांबळे पिता-पुत्रांचा सेंद्रिय खत वापरावर भर आहे. बागेतील पालापाचोळा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करतात. शिवाय गांडूळ खत तयार करून बागायतीसाठी वापरत आहेत. रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करताना, आवश्यकता भासली तरच फवारणी करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून उत्पादन दर्जेदार व अधिक आहे.
'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीवर भर
सुरुवातीला आंब्याला मार्केटमध्ये दर चांगला मिळतो. त्यामुळे ४० टक्के आंब्याची विक्री करतात. वाशी मार्केटमधील दर गडगडले की, थेट विक्रीवर भर देतात. खत, कीटकनाशक फवारणी, पाणी व्यवस्थापन याच्या योग्य नियोजनामुळे त्यांच्या बागेतील फळ दर्जेदार आहे. मुंबई, पुण्यातील ग्राहकांना दर्जेदार आंबा घरबसल्या मिळत असल्याने त्यांच्याशी संपर्क साधून ते विक्री करत आहेत. चांगल्या फळांसाठी ग्राहकही पैसे मोजण्याची तयारी दर्शवितात. 'शेतकरी ते ग्राहक' थेट विक्रीवर भर दिल्याचा गजानन कांबळे यांना फायदा होत आहे. आंब्यासह काजू विक्रीसाठीही हीच पद्धत अवलंबली आहे. ओल्या काजूगरांना वाढती मागणी आहे. त्यामुळे ७० टक्के ओला काजूगर काढून विकला जातो. उर्वरित ३० टक्के वाळलेल्या काजूबिया चांगला दर पाहून विक्री करतात.
पदवीधर मुलाची मदत
गजानन यांचा मुलगा प्रसाद पदवीधर आहे. पदवीच्या शिक्षणानंतर नोकरी शोधण्याऐवजी त्यानेही शेतीकडे लक्ष केंद्रित केले आहे. पावसाळ्यात खते घालणे, बागेची साफसफाई, फवारणी, आंबा काढणी, वर्गवारी, पॅकिंग, विक्री, ग्राहकांशी संपर्क एकूणच प्रत्येक कामात प्रसादची मदत वडिलांना होत आहे. खरिपात भात व नागली लागवड करण्यात येते. त्यामुळे शेतीची सर्व प्रकारची कामे योग्य नियोजनाने कांबळे पितापुत्र करत असून, त्याचा फायदा झाला आहे.
तांत्रिक मार्गदर्शनाचा फायदा
पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी त्याला व्यावसायिकतेची जोड दिली तर चांगले अर्थार्जन होते. निव्वळ शेती करण्यापेक्षा अधिकाधिक उत्पन्न कसे मिळेल यासाठी तंत्रशुद्ध मार्गदर्शनाची आवश्यकता भासते. भातासाठी बियाणांची निवड असो, बागायतीसाठी सेंद्रिय व रासायनिक खतांचे प्रमाण किती असावे, कोणती कीटकनाशके व ती कधी वापरावी, फळे कधी काढावीत, किती वेळेत पॅकिंग करावीत, याबाबत गजानन कांबळे कृषितज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असून, त्याचा त्यांना व्यवसायात चांगला फायदा झाला असल्याचे सांगितले.