मेहरून नाकाडे
रत्नागिरी : बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीसाठी प्रयत्न न करता, शेती करण्याचे निश्चित केले. बारमाही शेती करून अधिकाधिक उत्पन्न कसे मिळविता येईल यावर लक्ष केंद्रित केले.
त्याचप्रमाणे 'शेतकरी ते ग्राहक' या तंत्राचा अवलंब घराडी (ता. मंडणगड) येथील समीर बळीराम बालगुडे हा तरुण करीत आहे. स्वतः उत्पादित केलेल्या भाज्यांची स्वतःच विक्री करत आहे.
खरीप हंगामात भात, नाचणी, भेंडी, काकडी, पडवळ, हळद, तर रब्बीमध्ये पावटा, कडवा, पालेभाज्या, शिवाय हिरवी मिरची, कलिंगड लागवड करीत आहेत. लागवडीसाठी बियाणे निवडणे किंवा रोपे आणणे, खत व्यवस्थापन, काढणी, विक्री स्वतःच समीर करीत आहे.
समीरचे आई-वडील शेती करत असत. त्यामुळे समीरने पालकांकडून प्रेरणा घेत शेती करण्याचा निर्णय घेतला. कोकणच्या लाल मातीत असलेल्या पोषक घटकांमुळे विविध पिके घेता येतात, हे समीरने सिद्ध केले आहे.
रासायनिक खतांचा मर्यादित वापर व सेंद्रिय खतांचा वापर करून पिकाचा दर्जा व उत्पन्नवाढीसाठी सतत प्रयत्नशील आहे. समीर खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर भात, तर दीड एकर क्षेत्रावर नाचणी लागवड करत आहे.
भात घरात खाण्यासाठी ठेवतो. नाचणीला मागणी जास्त असल्यामुळे विक्री करतो, भातापेक्षा नाचणीचे लागवड क्षेत्र अधिक आहे. तसेच प्रत्येकी २० गुंठे क्षेत्रावर भेंडी, हळद, काकडी, तर पाच गुंठे क्षेत्रावर पडवळ लागवड केली आहे.
प्रत्येक हंगामात विविध पिके घेत असून उत्पादकता वाढीसाठी तो सतत प्रयत्नशील आहे. त्यासाठी कृषी अधिकारी जे. एम. पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
कलिंगडाचा खप
ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये कलिंगडाची लागवड केल्यावर शिमग्यात कलिंगडाचे उत्पादन तयार होते. याच वेळी उष्मा सुरू होत असल्याने कलिंगडाचा खप चांगला होतो. लागवडीसाठी उत्तम प्रतीची रोपे खरेदी करून लागवड, खत, पाणी व्यवस्थापनामुळे कलिंगडाचे उत्पन्न चांगले बहरते. स्वतः विक्री करत असल्याने दरही चांगला मिळतो. शेताच्या बांधावर/गावात स्टॉल टाकून कलिंगडाची विक्री समीर करतो.
भाज्यांना मागणी
पावसाळ्यात भेंडी, पडवळ, काकडी, तर रब्बीमध्ये मुळा, माठ, पालक, कोथिंबीर, हिरवी मिरची, कडवा, पावटा लागवड करतात. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून ठराविक अंतरावर वाफे तयार करून त्यावर मल्चिंग पेपरने मल्चिंग करतात. त्यामुळे तण येत नाही. बी/रोपांची लागवड करतात. योग्य मशागतीमुळे उत्पन्न चांगले मिळत आहे. ५ गुंठ्यांत १० क्चिंटल भेंडी, २० गुंठ्यांत ३०/३५ गुंठे काकडीचे उत्पन्न घेत आहेत.
केवळ पारंपरिक पद्धतीने शेती न करता एकाच वेळी विविध उत्पादने कशी घ्यावीत, पिकाचा दर्जा, उत्पन्नाबरोबर विक्रीवर लक्ष केंद्रित केले. योग्य मशागतीमुळेच जास्तीत जास्त उत्पादन मिळविण्यात यश आले आहे. आई- वडिलांची शेतीच्या कामासाठी मदत होते. यावर्षी काकडी, पडवळ, भेंडीचे चांगले उत्पन्न मिळाले असून विक्री सुरू आहे. आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे भातापेक्षा नाचणीची लागवड केली आहे. खताची मात्रा देताना नॅनो युरियाचा वापर केला त्याचा चांगला फायदा झाला. भाज्या, कलिंगड विक्री स्वतःच करीत असल्यामुळे ग्राहक शेताच्या बांधावर येतात. शिवाय गावात स्टॉल लावून विक्री करतो. - समीर बळीराम बालगुडे, घराडी