मेहरून नाकाडे
रत्नागिरी : वकिली करून पक्षकारांना न्याय मिळवून देत असतानाच चिपळूण तालुक्यातील तोंडली गावातील अॅड. प्रशांत प्रकाश सावंत यांनी आपली शेतीची आवड जपली आहे. भात, आले, हळद, आंबा, काजू उत्पादन ते घेत आहेत. सेंद्रिय उत्पादनावर भर असल्यामुळे गांडूळ खत निर्मितीही करत आहेत.
अॅड. सावंत यांनी एकूण १४ एकर क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. दोनशे हापूस आंबा तर एक हजार काजूची लागवड केली आहे. पाचशे सुपारीची झाडे लावली आहेत. खरीप हंगामात एक एकर क्षेत्रावर भात लागवड करून उत्पादन घेत आहेत. तसेच दहा गुंठे क्षेत्रावर आले तर दहा गुंठे क्षेत्रावर हळद लागवड करीत आहेत. बागेतील पालापाचोळा एकत्र करून बागेतच गांडूळ खतनिर्मिती युनिट तयार केले असून चार ते पाच टन गांडूळ खत तयार करत आहेत. बागायतींसाठी या खतांचा वापर ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील उत्पादित शेतमालाचा दर्जा व उत्पादन सकस आहे. वकिली पेशा असल्याने न्यायालयात तसेच अन्य कामांसाठी अॅड. प्रशांत यांना बाहेर जावे लागते. परंतु त्यांच्या अर्धांगिनी चैताली यांची त्यांना शेतीच्या कामासाठी चांगलीच मदत होत आहे.
उत्पादित आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी न पाठवता मुंबई, पुण्यातील ग्राहकांशी थेट संपर्क साधून विक्री करत आहेत. त्यांच्या बागेतील आंबा फळ मोठे, दर्जेदार आहे. त्यामुळे दर चांगला मिळतो. पत्नी चैतालीसह वडील व काकांचेही सहकार्य त्यांना मिळत आहे. काजूबी ची विक्री चांगला दर पाहून केली जाते. दरवर्षी चार ते पाच टन काजू बी त्यांना प्राप्त होत आहे. सुपारी वाळवून विक्री करत आहेत. शेतीतून आर्थिक प्राप्तीचा मार्ग त्यांनी निवडला आहे.
यांत्रिक अवजारांचा वापर
शेतीसाठी मजुरांची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावते. मजूर जे काम तास सन् तास करत असतात, तेच काम यांत्रिक अवजारांमुळे काही तासात होते. त्यामुळे नांगरणीसाठी पॉवर टिलर, गवत कापणीसाठी ग्रास कटर, फवारणीसाठी स्प्रे पंप, तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर फायदेशीर ठरत आहे. पाण्यातून देण्यात येणारी खते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून देणे सुलभ ठरते. यांत्रिक अवजारांमुळे मानवी श्रम कमी झाले आहेत. परंतु काम काही तासातच पूर्ण होत असल्याने ते शेती कामासाठी यांत्रिक अवजारांचा वापर करत आहेत. शेती करायची म्हटली की, जमीन, मशागत, बियाणे, खते, लागवड आली. यांत्रिक अवजारांमुळे वेळ वाचतो आणि कामही सुलभ झाले आहे.
आले, हळद लागवड
अॅड. प्रशांत यांनी भात लागवडीबरोबर दहा गुंठे क्षेत्रात आले व दहा गुंठे क्षेत्रात हळद लागवड केली आहे. हळद पावडर तयार करून विक्री करत आहेत. सेंद्रिय हळद पावडरसाठी विशेष मागणी होत आहे. बाजारात आल्यासाठी चांगला दर आहे. दहा गुठे क्षेत्रावर आले लागवड केली असून सेंद्रिय खतामुळे आल्याचे चांगले उत्पादन मिळत आहे. आले, हळदीची विक्री हातोहात होत असल्याने अॅड. प्रशांत यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
बारमाही शेतीतून उत्पन्न
खरीप हंगामात भात, आले, हळद, भाजीपाला लागवड तर उन्हाळी आंबा, काजू उत्पादन घेत आहेत. बारमाही शेतीतून उत्पन्न घेत असताना उत्पादन व त्याचा दर्जा राखण्यास मदत होत आहे. सेंद्रिय उत्पादनामुळे शेतमालाला दरही चांगला लाभत आहे. शेती करताना मशागत, बियाणे, खते, लागवड, काढणी याबाबत अॅड. प्रशांत अभ्यास करून निर्णय घेतात. शिवाय वेळोवेळी कृषी तज्ज्ञ संदीप डोंगरे यांचेही मार्गदर्शन घेत आहेत. कुटुंबीयांच्या मदतीमुळे शेतीची आवड जपण्यास अॅड. प्रशांत यशस्वी ठरले आहेत.
आंब्याची खासगी विक्री
हवामानामुळे आंबा पिकावर परिणाम होत असला हे खरे असले तरी बाजारात एकाचवेळी आंबा आला की दर गडगडतात, व्यापारी दर कमी देतात. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी आंबा बाजारात न पाठवता त्याच्या खासगी विक्रीवर भर दिला आहे. मुंबई, पुण्यातील ग्राहकांना घरपोच आंबा पाठवित आहेत. दर्जेदार निवडक फळे एक ते दोन डझनचे बॉक्समध्ये भरून विक्री करतात. त्यामुळे ग्राहकांकडून दर चांगला मिळतो, शिवाय विक्रीही चांगली होत आहे. बाजारपेठेत आंबा पाठवून आर्थिक नुकसान सहन करण्यापेक्षा खासगी विक्रीवर भर आहे.