मेहरून नाकाडे
रत्नागिरी : लग्नानंतर मुंबईला रामराम करून दापोली तालुक्यातील कुडावळे येथील कृष्णा बाबू मोरे यांनी गाव गाठले. कृष्णा मोरे मजुरी करताना शेतीचे तंत्र अवगत केले. पडिक जमीन भाड्याने घेऊन शेती केली. शेतमाल विकून साठवलेल्या पैशांतून सात एकर जमीन खरेदी केली आहे.
कृष्णा मोरे अशिक्षित असले, तरी ते अभ्यासू असल्यामुळेच त्यांनी मजुरी करताना, शेती कशी करावी, कोणत्या हंगामात कोणती पिके घ्यावी, शेतमाल कसा विक्री करावा, याचे गमक शोधले. मजुरी करतानाच स्वबळावर एक एकर पडिक जमीन भाड्याने घेतली.
कामावर जाण्यापूर्वी दररोज लवकर उठून शेताची मशागत करत असत. जमीन लागवडीयोग्य केल्यानंतर पावसाच्या पाण्यावर भेंडी लागवड केली. आईच्या सल्ल्याने भेंडीमध्ये आंतरपीक म्हणून चिबुड लागवड केली.
आश्चर्य म्हणजे भेंडीचे पीक चांगले आले. भेंडी संपताच चिबुडाचे उत्पादन सुरू झाले, त्यामुळे त्यांना चार पैसे मिळाले. याप्रमाणे ते शेती करू लागले.
पावसाळ्यात भात, नागली, चिबूड, काकडी, भेंडी, अळू, गवती चहा, दोडके, पडवळ, तांबडा भोपळा, दुधी भोपळा, रब्बी हंगामात मिरची, वांगी, मूळा, माठ, पालक, मोहरी, पावटा, गवार, वालीच्या शेंगा अशा विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करू लागले.
भाजीपाला उत्पादन घेत असतानाच, स्वतःच दापोली शहरात स्टॉल लावून विक्री करू लागले. त्यामुळे ओळखी वाढल्या, चांगल्या प्रकारच्या व एकाचवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या विक्री करत असल्यामुळे ग्राहकही त्यांच्याकडून भाज्या खरेदी करत आहेत.
अविरत कष्ट, चिकाटी, प्रयत्नाच्या बळावर कृष्णा मोरे यांनी परिस्थितीवर मात करून ते जमिनीचे मालक बनले आहेत.
मोफत मार्गदर्शन
गावातील जुने, अभ्यासू शेतकरी म्हणून कृष्णा मोरे यांची ओळख आहे. गावातील, तसेच पंचक्रोशीतील अनेक शेतकरी शेतीबाबत त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कृष्णा यांना शेतीच्या कामासाठी पत्नी, दोन मुले यांचे सहकार्य लाभत आहे. दर्जेदार शेतमाल उत्पादनावर त्यांचा भर आहे.
सेंद्रिय खताचा वापर
शेतीशी संलग्न दुग्धोत्पादन, शेळी पालन व्यवसाय कृष्णा मोरे करीत आहेत. त्यांच्याकडे गावठी गायी आहेत. गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत, जीवामृत तयार करून शेतीसाठी वापरतात. शेळीचे लेंडीखतही शेतीसाठी वापरत आहेत. सेंद्रिय खताच्या वापरामुळे भरघोस उत्पादन व दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे बाजारात त्यांच्याकडील शेतमालाची विक्री हातोहात होते. स्थानिक/गावठी भाज्यांना चांगली मागणी आहे.
एकही गुंठा स्वतःची जमीन नव्हती, मात्र गावातील पडिक जमीन भाड्याने घेऊन शेती सुरु केली. विविध प्रकारची पिके लावत असून विक्रीही करतो. पैसे साठवून स्वतः मालकीची जमीन खरेदी केली. शेतीचे शिक्षण नव्हते, परंतु अनुभवातून शिकत गेलो. स्वतःला माहिती असलेल्या चार गोष्टी इतरांना सांगितल्या, तर स्वतःचे नुकसान होत नाही, परंतु अन्य लोकांनी त्या अवगत करून त्यांना फायदा होत असेल, तर यापेक्षा मोठे समाधान कोणतेही नाही. थोडक्यात जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा, एवढीच माफक इच्छा आहे. माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात, हा माझा नाही तर येणाऱ्यांचा मोठेपणा आहे. असे मला वाटते. - कृष्णा बाबू मोरे, कुडावळे (दापोली)
अधिक वाचा: E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर