- दत्ता लवांडे
एके काळी पुण्यात युपीएससीची तयारी करणाऱ्या तरूणाची ही गोष्ट. विनोद नवले त्याचं नाव. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील केत्तूर नंबर २ येथील हा उमदा तरूण. विनोद शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळे त्याला पहिल्यापासूनच शेतीची आवड. म्हणूनच पुढे कृषी क्षेत्रात शिक्षण घेतले. सरकारी नोकरी करण्याच्या हिशोबाने पुण्यात यूपीएससी करू लागला. युपीएससी परिक्षेत मुलाखतीपर्यंत त्याने झेप घेतली पण पहिल्या प्रयत्नात अपयश आले आणि थेट गाव गाठलं. वडिलोपार्जित पारंपारिक शेतीमध्ये बदल करून काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीने त्याने पावले उचलली.
शेतीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं, रात्रंदिवस मेहनत घेतली, नवीन पिके घेतले पण त्यामध्ये घेतलेल्या आंतरपिकातून विनोदने दोनच महिन्यामध्ये तब्बल २० लाखांची कमाई केलीये. यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात यश मिळालं नाही पण त्याचा कडता विनोदने आंतरपिकातील उत्पन्नातून काढलाय. या पठ्ठ्याचा नादच खुळा म्हणावा लागेल. शेतकऱ्यांची पोरं 'लाथ मारेन तिथं पाणी काढेन' या वृत्तीची असतात असं म्हणतात ते काय चुकीचं नाही हे विनोदच्या प्रवासातून दिसून येतंय. जाणून घेऊया त्याचा प्रवास...
खरं तर शेतकरी कुटुंबातील असल्याने विनोदने लहापणापासून शेतीत काम केलं होतं. लहानपणापासून शेतीत बागडल्यामुळे त्याला आवड होतीच. म्हणून पुढे त्यांने कृषी क्षेत्रात पदव्युत्तर पदवी घेतली आणि स्पर्धा परिक्षांची तयारी करू लागला. सुरूवातीचे तीन वर्षे दिल्लीत आणि त्यानंतर पुण्यातील स्पर्धा परिक्षांचं माहेरघर असलेल्या पेठांच्या भागात त्याने १ वर्ष अभ्यास केला.
अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीमुळे तो दुसऱ्याच अटेम्प्टमध्ये युपीएससीच्या मुलाखतीपर्यंत पोहोचला. पण त्यावेळी त्याला यश आलं नाही. स्पर्धा परीक्षेसाठी ठराविक वेळ दिल्यानंतर त्याला एक ठोस निर्णय घ्यावा लागणार होता. त्यामुळे त्याने शेतीचा पर्याय निवडला. युपीएससी करत असताना शेती क्षेत्रातील नवीन संधी, नवीन तंत्रज्ञान आणि शेतीचं महत्त्व समजून आल्यामुळे त्याने कुठेही नोकरी न करता शेती करायचं ठरवलं.
...अन् सुरू झाला शेतीतला प्रवास
मागच्याच वर्षी म्हणजे २०२३ च्या जानेवारी महिन्यात त्याने प्रत्यक्षात शेतीला सुरूवात केली. सुरूवातीला जवळपास १ ते २ महिने आसपासच्या भागातील प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या, शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले आणि आपल्या भागात कुठली पिके चांगली येऊ शकतात, त्या पिकाचे अर्थकारण, बाजारपेठ या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्यानंतर actual शेतीत बदल करायला सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने ऊस पीकाखालील असलेल्या ५० एकर क्षेत्रापैकी २० एकरवरील उस कमी केला आणि त्यातील १६ एकरवर केळी आणि उर्वरित क्षेत्रावर पेरू लागवड केली.
आधुनिक तंत्रज्ञान वापरत त्याने पारंपारिक पाटाने पाणी देण्याची पद्धत पूर्णपणे बंद केली व ड्रिप इरिगेशन पद्धत वापरायला सुरुवात केली. शेतीमध्ये सेंद्रीय प्रयोग करण्याच्या हेतून त्याने शिवश्री गांडुळखत प्रकल्प नावाने सेंद्रीय खते बनवायला सुरुवात केली. त्या माध्यमातून तो गांडूळखत आणि वर्मीवॉश घरीच बनवतो. त्यामुळे त्याचा रसायनिक खतांवरील खर्च कमी झाला आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यास सुरूवात झाली.
शेती करत असताना केळी किंवा पेरू लागवड केल्यानंतर त्यातून आपल्याला इनकम भेटायला खूप दिवस लागतात तसेच त्या पिकातील मोकळी राहिलेली जमीन तशीच राहते म्हणून विनोदने त्या पिकातील जमिनीचा योग्य वापर करण्याच्या आणि कमी दिवसांत आपलं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने कलिंगड पिकाची आंतरपीक म्हणून लागवड केली. त्याने आत्तापर्यंत जवळपास १२ एकरवर आंतरपीक लागवडीचे हे प्रयोग केले आणि ते सगळे यशस्वी झाले.त्याने आत्तापर्यंत जवळपास ११ एकर कलिंगड आणि १ एकर खरबूज आंतरपीक म्हणून घेतलं आहे. तर आंतरपिकाच्या माध्यमातून मुख्य पीक असलेल्या केळी आणि पेरूचा पूर्णपणे खर्च वाचल्याचं विनोदने सांगितलं आहे.
आंतरपिकाचे व्यवस्थापन
कलिंगड हे फक्त ६० दिवसांच म्हणजे २ महिन्यांच पीक आहे. त्याला लावायचं म्हटलं की, साधारणपाने एकरी ८०-९० हजाराच्या वर खर्च येतो पण विनोदने आंतरपीक म्हणून कलिंगडाची लागवड केल्यामुळे आणि सेंद्रीय खतांचा वापर केल्यामुळे खर्च प्रति एकर ६० ते ७० हजाराच्याही खाली आला. आंतरपीक असल्यामुळे उत्पादन काहीसे कमी मिळाले पण साधारणपणे १५ ते २० टन उत्पन्न मिळाले. प्रत्येक वेळेस विनोदला १० ते १२ रूपयांचा दर मिळाल्यामुळे त्यातून त्याने लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
आंतरपिकामुळे वाचला खर्च
यामुळे मुख्य पीक असलेल्या केळीचा पूर्ण खर्च वाचला आणि त्यामुळे मुख्य पीक हे पूर्णपणे फायद्याचे ठरले आहे. त्याचबरोबर बेसल डोस, ड्रिप, मल्चिंग पेपर हे दोन्ही पिकांना सारखेच असल्यामुळे तो खर्च कमी झाला. तसेच खुरपणीचा खर्च वाचला आणि उत्पन्न वाढायला मदत झाली
केवळ आंतरपिकातून २० लाखांचे उत्पन्न
चार एकर केळी मधे कलिंगडाची आंतरपीक म्हणून लागवड केली होती. त्यातून साधारणपणे ७० टन कलिंगड निघाले असून त्याला १० रूपयांपेक्षा अधिक दर मिळाला. आंतरपिकाच्या माध्यमातून विनोदने आत्तापर्यंत साधारणपणे १५ ते २० लाखांचे उत्पन्न कमावले आहे. तो आणखी १५ ते २० एकर नवीन आंतरपिकांची लागवड करायचं नियोजन करत असून पुढील आठवड्यामध्ये ५ एकर नवीन कलिंगडाची लागवड करणार आहे.
सातत्य
तसं पाहिलं तर विनोद हा पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेला तरूण असूनही त्याने स्वतःला शेतीमध्ये एवढं झोकून दिलंय की, त्याने आपल्या शेतीलाच आपलं घर बनवलं आहे. तो कधीच आपल्या शेतातून बाहेर जात नाही. पिकांवर नीट लक्ष देऊन त्यावर येणारा रोग, पिकांची गरज ओळखून खते, औषधे देण्यात सातत्य राखले. त्यामुळे विनोदला हे यश आलं आहे. कोणत्याही शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन, कामात सातत्य आणि बाजाराचा अभ्यास केला तर नक्कीच फायदा होतो असं विनोद सांगतो.
दरम्यान, विनोदच्या शेतीतील या यशामध्ये त्याचा भाऊ रणजीत तसेच आई वडील आणि वहिनी यांचे खूप महत्वाचं योगदान आहे. 'आम्ही सगळे मिळून शेतीत काम करतो त्यामुळेच हे यश मिळत आहे' असं विनोद सांगतो. एकेकाळी पुण्यातील स्पर्धा परिक्षा करणाऱ्या तरूणांच्या गर्दीत तो आपल्या स्वप्नांची दिशा शोधत होता पण शेतीचा पर्याय निवडला अन् त्यातही त्याने उत्तुंग यश मिळवले आहे. तरूण विनोदचा शेतीतला हा प्रवास आपल्याला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.