Join us

सिताफळ लागवडीतून दुसऱ्याच वर्षी अडीच लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 7:50 PM

फळबागेतून साधला जातोय शेतीचा उन्नत मार्ग 

- रविंद्र शिऊरकर

छत्रपती संभाजीनगर : पारंपारिक शेतीला फाटा देत फळबाग लागवडीतून शेतकऱ्याने चांगला नफा कमावल्याची बातम्या अनेकदा ऐकायला येतात. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचखेडा खुर्द येथील आप्पासाहेब रामदास घुले या शेतकऱ्याने मजुरांच्या कमतरतेतून मार्ग काढण्यासाठी सिताफळ लागवडीतून चांगला नफा कमावला आहे.

वडिलोपार्जित वीस एकर जमीन, मोठा भूखंड असल्याने सतत मजुरांची कमतरता, वेळेवर कामे न झाल्याने पारंपरिक कांदा, ऊस, मका, आदींच्या उत्पन्नातून आर्थिक फायदा कमी मिळायचा. यावर उपाय म्हणून घुले यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध अधिकारी, कृषी विभाग यांना भेटी देत फळबागेची माहिती घेतली. ज्यात सामाजिक वनीकरण कन्नड यांच्या योजनेतील सिताफळ लागवड करण्याचे योजिले. त्यानुसार २०२० मध्ये चार एकर क्षेत्रात १६ फूट बाय ८ फूट अंतरावर एन एम के सुपर गोल्डन जातीची बार्शी येथून आणलेली १६०० रोपे लावली. 

पाणी व्यवस्थापन पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेला हा भाग जेमतेम डिसेंबर - जानेवारी पर्यंत जिरायती असतो. पुढे काही पीक घ्यायचे ठरवले तर पाणी टंचाईमुळे शक्य होत नाही. यावर उपाय काढत आणि क्षेत्र मोठे असल्याने आप्पासाहेब यांनी २ एकर क्षेत्रात स्वखर्चाने खोदलेले शेततळे केले असून यात आता कापड टाकून पुढे सिताफळ बागेचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या असलेल्या बागेला झाडांच्या दोन्ही बाजूला दोन पाईप या प्रमाणे ठिबक द्वारे पाणी देतात.

सिताफळ बागेचे व खतांचे व्यवस्थापन वार्षिक एकदा एकरी २-३ ट्रॉली शेणखताचे झाडांना आच्छादन केले जाते सोबत मिश्र खतांचा भेसळ डोस दिला जातो तसेच वार्षिक ८ ते १० विविध बुरशीनाशक व किटकनाशकांची फवारणी केली जाते. लोकरी मावा या बुरशीचा सिताफळात अधिक प्रमाण असल्याने वारंवार बुरशीनाशकांची फवारणी करावी लागते असे आप्पासाहेब यांनी सांगितले. 

सिताफळ बागेतून मिळणारे उत्पन्न लागवड केल्यानंतर तिसऱ्या वर्षांपासून आप्पासाहेब यांना फळे मिळू लागली असून पाहिल्या वर्षी अल्प प्रमाणात फळे मिळाली तर गेल्या वर्षी जवळपास दोन तीन तोड्यात जवळपास २ टन उत्पादन मिळाले असून जागेवर ७० रुपये ते १०० रुपये दर मिळाला ज्यातून सरासरी २ ते २.५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बागेची वाढ व वेळोवेळी लक्ष देत असून या वर्षी ६ ते ७ टन उत्पादन अपेक्षित आहे. 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी