प्रशांत विखे
शेतकरी शेतात सातत्याने नवनवीन प्रयोग करीत आहेत. या माध्यातून चांगले उत्पन्न घेत आहेत. असाच एक वेगळा प्रयोग अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांनी अमेरिकन चिया पिकाची लागवड केली असून, आता हे पीक काढणीला आले आहे. पीक चांगल्या अवस्थेत आहे व यातून चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे.
चिया पीक कमी खर्चाचे असून, उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. विशेष म्हणजे, या पिकाला वन्य पाण्याचा त्रास नाही. इतरत्र माहिती मिळवत तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील गोवर्धन पाटील अहेरकर यांनी तीन, तर श्रीकृष्ण हगवणे यांनी चार एकरांत व तेल्हारा येथील अमोल बिडवे यांनी चिया पिकाची यावर्षी लागवड केली. अमेरिकन, कनार्टक, मध्य प्रदेश येथे चियाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे या शेतकऱ्यांनी निमज येथून बियाणे मिळविले व लागवड केली.
पिकाला मिळतोय १५ ते २० हजार रुपये क्विंटल दर
चिया या पिकाची लागवड सोयाबीन काढणीनंतर नोव्हेंबर महिन्यात केली जाते. पेरणीही ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाते. या पिकाला स्प्रिंक्लरच्या साह्याने पाणी दिले जाते किंवा पाण्याची सोय उपलब्ध असल्यास दांडानेही पाणी दिले जाते. बियाण्यांचा खर्च कमी, जैविक खत व फवारणी करावी लागते. एक वेळ निंदण, डवरणी करावी लागते. ट्रॅक्टरच्या साह्याने हे पीक तयार केले जाते.
पीक तयार झाल्यानंतर त्याची विक्री मध्य प्रदेशातील निमज येथे होते. चियाचा उपयोग विविध औषधींसाठी केला जात असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात राहते. एकरी पाच-सात क्विंटलप्रमाणे उत्पादन होते व १५ ते २० हजार रुपये क्विंटलप्रमाणे दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले,
चिया हे पीक नावीन्यपूर्ण असून, प्रयोगशील शेतकऱ्यांनी या भागात यावर्षी चियाची लागवड केली आहे. इतरही शेतकयांनी या पिकाची लागवड करण्यास काही हरकत नाही. - गौरव राऊत, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा
ही पिके परवडेना!
तेल्हारा तालुक्यात भूगर्भात पाणी असून, सोबत वान धरण पाठीशी आहे. शेतकरी या भागात खरिपात कपाशी, तूर, सोयाबीन तर रब्बीत गहू, हरभरा, मका, ज्वारी, भुईमूग हे पीक घेतात; परंतु गत काही वर्षांपासून रोगराई, पावसाचे कमी-अधिक प्रमाण वाढले आहे. तसेच वन्यप्राण्यांचा वाढत्या त्रासाने शेतकऱ्यांना आता ही पारंपरिक पिके परवडत नसल्याने शेतकरी आधुनिक पिकांकडे वळाले आहे.