नासीर कबीर
सोलापूरातील करमाळा तालुक्यात वाशिंबे येथील यांनी आपल्या शेतात 'ब्लू जावा' या परदेशी वाणाची लागवड केली आहे. पुणे येथील एका खासगी नर्सरीच्या माध्यमातून विदेशातून ब्लू जावा वाणाच्या कंदाची मागणी केली. या केळी बागेची येत्या पंधरा ते वीस दिवसांत कापणी सुरू होईल.
हे वाण इतर स्थानिक वाणाप्रमाणेच दहा महिने कालावधीत काढणीस आले आहे. झाडाचा रंगही हिरवा गर्द असून, झाडाची १२ ते १३ फुटांपर्यंत वाढ झाली आहे. या ब्लू जावा केळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ब्लू जावा केळी 'निळ्या' नावानेही ओळखले जाते व याला आईस्क्रीम केळी म्हणूनही ओळखले जाते.
आतील गाभा मलईदार आहे. या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे सालीचा रंग निळसर असल्याने ज्याला 'ब्लू जावा' असे म्हणतात.केळ्यांचा आकार मध्यम असून, एका घडात दहा ते बारा फण्या असतात.
ही केळी नैसर्गिकरीत्या गोड, चवीला किंचित व्हॅनिलासारखे आणि क्रीमयुक्त असतात. मागील काही वर्षांत केळीसह विविध पिकांच्या वाणावर अशा पद्धतीने प्रयोग केले जात आहेत
अमेरिकेतून उपलब्ध केली रोपं..
■ ब्लू जावा हे वाण मूळ अमेरिका देशातील फ्लोरिडा प्रांतातील आहे. वाशिंबे येथील युवा शेतकरी अभिजीत पाटील हे पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेजला असताना त्यांच्या वर्गात अमेरिकेतील एक मित्र होता. वाशिंबे मध्ये यापूर्वी काही शेतकऱ्यांनी वेलची केळीचा प्रयोग यशस्वी केलेला आहे.
■ याची माहिती त्या अमेरिकन मित्राला होती त्यानुसार आमच्या अमेरिकेतील ब्ल्यू, जावा या केळीचा प्रयोग आपल्या गावी करावा अशी इच्छा त्याने अभिजीत पाटलांना बोलून दाखवली होती. त्यानुसार अभिजीत पाटलांनी कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील नर्सरीला ब्ल्यू जावा केळीचे रोप उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
■ त्यानुसार डी वाय पाटील नर्सरी ने ही रोपं अमेरिकेतून उपलब्ध करून घेत अभिजीत पाटलांना दिले, त्यानुसार अभिजीत पाटलांनी ब्ल्यू जावा केळीचा प्रयोग यशस्वीपणे वाशिंबे येथे राबवलेला आहे.
ब्लू जावा केळीचे आरोग्यदायी फायदे
■ही केळी जीवनसत्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध आहेत, ज्यामुळे संतुलित आहारासाठी एक परिपूर्ण जोड आहे. जेवणादरम्यान एक स्नॅक, स्मूदीजमधील घटक किवा मिठाईमधील गोड घटक अशी या केळीची विविधता आहे.
■ ही ब्लू जावा केळी पुणे येथील गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये पाठवली असता, ९० रुपये किलोप्रमाणे दर मिळाला. एकूण दोन एकरातून ४० टन उत्पादन निघण्याची आशा आहे.
करमाळा तालुक्यात वाशिंबे परिसरात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मागील चार ते पाच वर्षांत जी नाइन केळीसह वेलची केळीची लागवड येथील शेतकयांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या ब्लू जावा' या वाणाची दोन एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. या वाणाचा सर्व बाजूंनी म्हणजे येथील वातावरण, बाजारभाव, किडी-रोग याचा अभ्यास करावा. कृषी विभागाकडून बागेला भेट देऊन त्यातील बारकावे जाणून मार्गदर्शन केले जाईल. - संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी
ब्लू जावा केळीचा गर मलईसारखा आहे. केळीची चव व्हॅनिला आईस्क्रीमसारखी आहे. या वाणाचे अमेरिका, व्हिएतनाम, फिलिपाइन्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. भारतीय चलनानुसार या केळीचे दर अमेरिकेमध्ये ९०० रुपये किलोप्रमाणे आहेत. पुणे, मुंबईसह मोठ्या शहरांतील नामांकित कंपन्यांच्या मॉलमध्ये अशा जास्त दराने विकल्या जाणाया वाणांना निश्चित मागणी राहील. - अभिजीत पाटील, वाशिंबे, ता. करमाळा
अधिक वाचा: दुष्काळी भागात आल्याचा प्रयोग; १४ गुंठे आल्यातून छप्परफाड कमाई