कोरडवाहू पारंपरिक शेतीच्या अल्प उत्पन्नात वाढ करण्याचा हेतूने लावलेल्या फळबागेचे प्रक्रिया उद्योगात रूपांतर करून कानडे दांपत्य आज वार्षिक चांगली आर्थिक उलाढाल करत आहे.
नोकरीनिमित्त वास्तव्यास असताना १९९५ -९७ दरम्यान दाभाडी तालुका कन्नड जिल्हा छ्त्रपती संभाजीनगर येथे भालचंद्र देविदास कानडे यांनी ७ एकर कोरडवाहू शेती विकत घेतली होती. पुढे सिंचन व्यवस्थेकरिता परिसरातील एका धरणातून पाईपलाईन द्वारे पाणी उपलब्ध करत त्यांनी पारंपारिक शेतीला सुरुवात केली.
मात्र पारंपारिक शेतीत उत्पन्न हाती येत नसल्याने २००० साली कानडे यांनी फळबाग लागवड केली. ज्यात १.५ एकर १५ फूट बाय १५ अंतरावर आंबा व एक एकर आवळा लागवड केली होती. तर काही आवळा लागवड शेताच्या बांधावर केली होती.
आज आवळा बाग खोड पोखरणाऱ्या किडीमुळे काढली आहे. मात्र आंबा बाग सुस्थितीत असून सोबत नव्याने एक एकर आंबा लागवड देखील गेल्या वर्षी झाली आहे. तर बांधावरील आवळा मात्र फळांसह उत्तम स्थितीत आहे.
यासोबतच पारंपरिक पीक पद्धतीत काही अंशी जैविक, विना नांगरणी तंत्रज्ञान वापरून तुर, टोमॅटो, कांदा, हरभरा, सोयाबीन आदी पिके कानडे घेतात. शेतात पिकणारा माल मार्केटला विकता थेट ग्राहकांना विक्री व्हावा जेणेकरून दोन पैसे अधिकचे मिळतील याहेतून ते शेतात उत्पादित होणारी तुर, हरभरा यांची थेट विक्री न करता त्यापासून डाळ तयार करून विकतात. तर आंबा देखील घरीच पिकवून विक्री केला जातो.
२० वर्षांचा आवळा प्रक्रिया उद्योग कानडे अग्रो मार्फ़त तयार होणारे आवळा सुपारी, आवळा सरबत, आवळा कॅंडी आदीचे भालचंद्र गेल्या २० वर्षांपासून उत्पादन घेत आहे. ज्यात घरच्या व काही प्रमाणात बाहेरून विकत घेत १० ते १२ टन आवळ्यावर वार्षिक प्रक्रिया केली जाते. पुढे या सर्व प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची नाशिक, पुणे, छ्त्रपती संभाजीनगर येथे विक्री केली जाते. ज्यात नावीन्यपूर्ण चवीमुळे कानडेज् यांच्या उत्पादनाची बाजारात चांगली चलती आहे.
विना नांगरणी तंत्रासह मुक्त गोठ्यातून जैविक संवर्धन भालचंद्र यांनी आपल्या शेतात मुक्त गोठा उभारत त्यातून निघणाऱ्या शेण गोमूत्रावर प्रक्रिया करून त्यापासून ते जिवामृत व इतर जैविक निविष्ठा तयार करतात. सोबत शेतात विना नांगरणी शेती प्रयोग देखील ते करत आहे.
विना प्रक्रिया न मिळे मोबदला शेतात उत्पादित होणाऱ्या मालावर जोवर शेतकरी प्रक्रिया करत नाही तोवर त्याला योग्य मोबदला मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काही अंशी शेतमाल मार्केट मध्ये न विकता थेट ग्राहकांना विकणे गरजेचे आहे. - भालचंद्र कानडे.-