Join us

एकरी १५० टन उसाच्या विक्रमी उत्पादनामुळे अमोलने घातली कृषिभूषण पुरस्काराला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 11:56 AM

पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत दुधारी (ता. वाळवा) येथील अमोल लकेसर यांनी एकरी १५० टनापर्यंत उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतीबद्दल राज्य शासनाने लकेसर यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे.

नितीन पाटीलबोरगाव : पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत दुधारी (ता. वाळवा) येथील अमोल लकेसर यांनी एकरी १५० टनापर्यंत उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतीबद्दल राज्य शासनाने लकेसर यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे.

अमोल लकेसर म्हणाले, शेतकऱ्यांनी जमिनीची उभी आडवी मशागत करावी, पाण्याचे योग्य नियोजन, रासायनिक व सेंद्रिय खतांचा योग्य वापर व संतुलित आहार देणे गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जमिनीचे माती परीक्षण करण्याची गरज आहे. ऊस शेती तुम्हाला लखपती बनवणार आहे.

पाणी आणि खताचे योग्य व्यवस्थापन केल्यास ४० गुंठ्यांत सरासरी १२५ ते १५० टन उत्पन्न घेऊ शकता. वर्षाला चार ते पाच लाखांचे उत्पन्न हमखास मिळते. आमची दहा एकर शेती आहे. सहा एकर लागण करून पुढीलवर्षी चार एकर लावणं घेतात. सलग ९ वर्षे एकरी १४८ टनाचे सरासरी उत्पन्न मिळाले आहे.

शेतकऱ्यांनी शेतीची उभी आडवी नांगरट करावी. नंतर रोटर व कुरूटाने जमीन भुसभुशीत करून ४.६ फुटी (साडेचार) सरी सोडून एकरी ६,३०० उसाचे डोळे दीड फुटावर आडवी कांडी घालून लागण करावी. यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पाडेगावचे बियाणे वापरावे. प्रथम लावणीवेळी जर जमीन निचऱ्याची असेल तर सरळ खतांचा डोस द्यावा.

अधिक वाचा: उसावरील किडींचा रासायनिक आणि जैविक पद्धतीने असा करा बंदोबस्त

रासायनिक खताबरोबरच सेंद्रिय खताच्या १० बॅग वापराव्यात. ४५ ते ६० दिवसांनी बाळभरणीला दुसरा डोस द्यावा. युरिया, लिंबोळी पेंड मध्यम भरणीवेळी देण्याची गरज आहे. यामध्ये युरिया, पोटॅशियम असावे. मोठी भरणी १०० ते १२० दिवसांनी घ्यावी. यात डीएपी, युरिया, पोटॅश, निंबोळी पेंड, मायक्रो न्यूट्राॅन, सिलिकाॅन, मॅग्नेशियम सल्फेट, गंधक या खतांची मात्रा द्यावी.

सहाव्या महिन्यात पाला काठणीवेळी सरीच्या बाजूला चरी घेऊन १२:३२:१६, अमोनिअम सल्फेट, पोटॅश दुय्यम खत, निंबोळी पेंड शेवटचा डोस, मिरग्याचा डोस, अमोनिअम सल्फेट व पोटॅशियम एवढ्याचाच वापर करावा. वर्षात उसाला हेच फक्त सहा डोस द्यावेत व उसाचा पाला दोनच वेळा काढावा.

एका उसाचे वजन तीन किलो भरले पाहिजे. यासाठी संख्येचे नियोजन महत्त्वाचे आहे. यामुळे १२५ टनाचा उतारा पडेल. सेंद्रिय खतांच्या कंपोस्ट खतांचे दोन डोस महत्त्वाचे आहेत. लावण करताना १० बॅगचा एक डोस व भरणीच्या वेळी १० बॅगचा एक डोस असे एकरी २० बॅगचे डोस द्यावेत.

टॅग्स :ऊसशेतकरीपीकशेतीसेंद्रिय खतखतेराज्य सरकार