रविंद्र शिऊरकर
जेमतेम एक एकर शेती. ऊस, मका,सोयाबीनचा पारंपरिक पट्टा. ड्रॅगन फ्रूटची माहिती मिळवत अहमदनगर जिल्ह्यातील बाबासाहेब लांडगे या शेतकऱ्याला यशस्वी ड्रॅगन फ्रूट उत्पादक म्हणून आता ओळख मिळाली आहे. पारंपरिक सोयाबीन, मका पिकांचा ठरलेली चौकट मोडत ड्रॅगन फ्रूटमधून लाखोंचं उत्पन्न मिळाल्याचे ते सांगतात.
दहेगाव बोलका गाव नगरमधील कोपरगाव तालुक्यापासून साधारण २० किमीच्या अंतरावर. या गावात बाबासाहेब नारायण लांडगे यांचे एक एकर आठ गुंठे क्षेत्र. ऊस, कांदा, सोयाबीन, मका ही पारंपरिक पिके ते घेतात.गोदावरीच्या डाव्या कालव्यातून शेतीच्या बांधाजवळ आलेला हा पाट. मात्र, पाटाला वर्षभर पाणीच नसल्याने आडसाड ओलित तर कधी कोरडवाहू पिके निघत असल्याने उत्पन्न जेमतेम. पारंपरिक पिकातून उत्पन्नाची हमी नसल्यानं ड्रॅगन फ्रूटविषयी त्यांनी माहिती जमवायला सुरुवात केली.
काही मित्रांच्या मदतीने तर काही समाजमाध्यमातून अधिकची माहिती मिळवत आपल्या शेतातही हे फळ उगवेल याची या शेतकऱ्याला चांगली जाण. तरीही एका ड्रॅगन फ्रुटच्या शेताला भेट देत त्यांनी लागवड व काढणी समजून घेतली. पुढे कलकत्ता येथून " रेड रेड " या जातीच्या ड्रॅगन फ्रुटची मदर प्लॅन्ट मधून रोपे मागवली. सुरुवातीला २०१५ साली सिमेंट पोल रिंग पद्धतीचा वापर करत १० गुंठे ८ फूट बाय १० फूट अंतरावर ड्रॅगनची लागवड केली. यात चांगलं यश मिळतंय असं दिसू लागल्यानंतर पुढे आठ गुंठे क्षेत्रावर शेततळे उभारून पाण्याची तजवीज केली. आता बाबासाहेब यांच्या संपूर्ण एक एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूट बहरला आहे.
ड्रॅगन फ्रुटचे व्यवस्थापन
१० गुंठे क्षेत्रापासून सुरु झालेली ड्रॅगन फळाची शेती विस्तारत आज संपूर्ण एक एकरवर पसरली आहे. या फळासाठी वार्षिक चार ते पाच ट्रॉली शेणखत व सेंद्रिय कंपोस्ट खत दिले जाते. रासायनिक खते मात्र ते आवर्जून टाळतात.वेळोवेळी या ड्रॅगनची छाटणी केली जाते. वर्षाकाठी फक्त एक किंवा दोनदा बुरशीनाशकांची फवारणी केली जाते.
नेटच्या मदतीने उन्हापासून संरक्षण
ड्रॅगन फ्रुटच्या रोपांना एप्रिल- मे दरम्यान उन्हाच्या तीव्रतेने चट्ट्यांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे बाबासाहेब हे २ मीटर रुंदीचे शेडनेट वापरत ड्रॅगनचे उन्हाळ्यात दोन महिने उन्हापासून संरक्षण करतात. याचा ड्रॅगनच्या रोपांना वाढीसाठी व पुढे फळ धारणेत व्यवस्थित राहण्यासाठी फायदा होत असल्याचे ते सांगतात.
संबंधित-ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली जाते?
ड्रॅगन फ्रुटचे उत्पन्न
बाबासाहेब लांडगे सांगतात, वर्षाकाठी सरासरी १०-११ टन ड्रॅगन फ्रूट एक एकरातून मिळतात. ड्रॅगनचा आकार व स्थितीनुसार ७० ते २०० रुपये प्रति किलो असा दर मिळतो. काही प्रमाणात विक्रीही जागेवरून होते. उर्वरित ड्रॅगनची नाशिकला विक्री केली जाते. यातून सरासरी ८ ते १० लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळते. खर्च सरासरी एक लाख वजा करता ७ ते ८ लाख नफा मिळतो.
मागणीनुसार रोपांची विक्री
वेळोवेळी छाटणी होत असल्याने छाटणी केलेल्या ड्रॅगनच्या फांद्यांमधून लागवडक्षम रोपांची १५-२० रुपये दराने विक्री होते. तर स्टॅम्प पद्धतीने लागवडी जन्य विलगीकरण विरहित रोपांची १० रुपये प्रमाणे विक्री केले जाते.छाटणी केल्याचे बागेला फायदे असून सोबत त्यातून रोपांची विक्री होत असल्याने नफाही मिळतो.