सध्या नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. विहिरींनीही तळ गाठला आहे, त्यामुळे दुष्काळाचे वातावरण दिसत आहे. असे असतानाही एकेफळ येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने एक एकरातील आले पिकातून जवळपास १२ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे. त्यांना १५६ क्विंटल आले झाले आहे. या आल्याची आठ हजार रुपये क्विंटलने विक्री झाली.
इच्छाशक्ती व मेहनत करण्याची तयारी असल्यास कोणत्याही परिस्थितीवर आपण मात करू शकतो. पाण्याचे योग्य नियोजन, कमी खर्च आणि अंगमेहनत या बळावर चांगले उत्पन्न मिळते. मी यंदा एक एकरात आल्याची लागवड केली होती. त्यातून मला १२ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शेतकऱ्यांनाही चांगले उत्पादन मिळू शकते.- शिवाजी बोचरे, शेतकरी
मागील काही वर्षांपासून कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत आहे. त्यामुळे शेती करणे परवडत नाही. अनेक जण शेती विकून व्यवसाय करीत आहेत. अशा परिस्थितीतही भोकरदन तालुक्यातील एकेफळ येथील शिवाजी बोचरे या शेतकऱ्याने नियोजन करून एक एकरात आल्याची लागवड केली. पाणी, खते, मशागत आदींसाठी त्यांना दोन लाखांचा खर्च आला. सध्या आल्याची काढणी सुरू आहे. या आल्याची बाजारपेठेमध्ये विक्री केली जात आहे.
आल्याला आठ हजार रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे. बोचरे यांना जवळपास १५६ क्विंटल आल्याचे उत्पादन मिळाले असून, त्याचे एकूण १२ लाख रुपये झाले आहेत. खर्च वजा जाता निव्वळ १० लाखांचा नफा मिळाला आहे. शेती हा व्यवसाय घाट्याचा आहे, अशी ओरड सर्वत्र होत असताना योग्य नियोजन करीत मशागत करून दुष्काळी परिस्थितीही अल्पभूधारक शेतकऱ्याने चांगले उत्पादन काढून एक आदर्श निर्माण केला आहे.