जिद्दीने मेहनत केल्यास शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळू शकते. हे निमगाव केतकी येथील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. पोपट घुसाळकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी अत्यंत कमी पाण्यावर पेरू फळबाग यशस्वी करत पहिल्याच पिकात एकरी २५ टन विक्रमी उत्पादन घेतले आहे.
घुसाळकर यांना एकूण ११ एकर शेती असून त्यापैकी पाच एकर पेरू, चार एकर डाळिंब तर पाणी व्यवस्थापनासाठी एक एकर शेततळे आहे. त्यांचा पारंपरिक व्यवसाय भांड्याचे दुकान आहे. या व्यवसायाला बगल देत शेतीतून काहीतरी नावीन्यपूर्ण उत्पादन घेण्याचा मानस त्यांनी मनाशी बाळगला. पत्नी सुरेखा, मुले दीपक व संदीप यांना बरोबर घेत त्यांनी या शेतीचे व्यवस्थापन केले. जानेवारी २०१२ मध्ये किरण शेवाळे यांच्या अथर्व हायटेक नर्सरी (पाटेगाव जिल्हा अहमदनगर) येथून तैवान पिंक जातीची ३ हजार पेरूची रोपे १२ रुपये दराने आणली. ती रोपे ३ एकरात लागण केली.
सुरुवातीपासूनच व्यवस्थापन करण्यासाठी निमगाव केतकी येथील प्रसिद्ध फळ बागायतदार म्हणून नावलौकिक असलेले शेतकरी मच्छिंद्र भोंग यांचे मार्गदर्शन लाभले. एकरी अडीच लाखप्रमाणे तीन एकरासाठी साडेसात लाख रुपये खर्च आला. आणि यातून पहिल्या पिकातच साठ टन पेरूचे उत्पादन निघाले. एक्कावन रुपये प्रमाणे जागेवर दर मिळाला असून तीस लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळाले आहे. आणखी १५ टन माल शिल्लक असून सध्याचा दर पंच्याहत्तर रुपये आहे. त्यामुळे अजून ११ ते १२ लाख रुपये उत्पादन मिळेल, अशी माहिती दीपक व संदीप घुसाळकर यांनी दिली.
पारंपरिक व्यवसायाला बगल देत शेतीमध्ये वेगळा प्रयोग करण्याची जिद्द मनी बाळगत पेरूची लागवड केली. यासाठी योग्य नियोजन व मार्गदर्शन मिळाल्याने हा प्रयोग यशस्वी झाला आहे. शेतीमध्ये मेहनत केल्यास फळ नक्की मिळते. - पोपट घुसाळकर, शेतकरी