Join us

एका एकरातील टरबूज पिकातून मिळाले पावणे दोन लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2024 10:22 AM

कमी खर्चात एका एकरातील टरबूज पिकातून जास्त उत्पन्न घेण्याची शेतकर्‍याने साधली किमया

निसर्गाचा लहरीपणा अन् पाण्याची कमतरता जास्त खर्च करून उत्पन्नाची शाश्वती नाही. असे असतानाही जिद्द, चिकाटी, मेहनत घेऊन पीक लागवडीपासूनचे व्यवस्थापन व्यवस्थित करणे महत्त्वाचे आहे. हीच बाब ओळखून कमी खर्चात एका एकरातील टरबूज पिकातून जास्त उत्पन्न घेण्याची किमया पिठोरी सिरसगाव येथील तरुण शेतकऱ्याने साधली आहे.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथील तरुण शेतकरी अशोक भानुदास आटोळे यांनी टरबूज पीक म्हणून आपल्या एक एकरात ५ बाय १.२५ अंतरावर बियाणे वापरले. मल्चिंग, ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन करून टरबूज लागवड केली. या लागवडीतून जवळपास विक्रमी २५ मे. टन टरबुजाचे उत्पादन मिळाले आणि नफाही मिळाला.

यामध्ये १४ मे. टनाला ९.५० किलोप्रमाणे १ लाख २५ हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले. १० टनाला ७ रुपये किलोप्रमाणे ७० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूण १ लाख ९५ हजार उत्पन्न मिळाले. यामध्ये ३५ हजार रुपये खर्च सोडता निव्वळ  उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे.

दोन किलोपासून सहा किलोपर्यंत वजनाचे टरबूज असल्याने या टरबुजाला बाजारात मोठी मागणी होती. लागवडीसाठी वापरलेली आधुनिक पद्धत, खते, तणनाशक, कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले व्यवस्थापन यामुळे टरबुजाचे विक्रमी उत्पादन घेण्यात यश आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरवर्षी शेतात टरबूज लागवड

पारंपरिक पिके घेऊनही उत्पन्नाची शाश्वती नाही. त्यात अवकाळीचा फटका बसल्यानंतर मेहनत वाया जाते. उत्पन्नही कमी होते. यामुळे दरवर्षी शेतात टरबूज लागवड करून उत्पन्न मिळविले आहे. शेतीत प्रयोग करताना व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. - अशोक भानुदास आटोळे, शेतकरी, पिठोरी सिरसगाव

टॅग्स :पीकशेतीमराठवाडाशेतकरीफळे