दीर्घ काळ शेत रिकामे राहत असल्याचे बघून पपई मध्ये आंतरपीक म्हणून लागवड केलेल्या खरबूजने कोटमगाव बु. येथील अनिलरावांना पपई लागवडीच्या खर्चासह चांगला आर्थिक नफा मिळवून दिला आहे.
नाशिक जिल्ह्याच्या कोटमगाव बु. (ता. येवला) येथील प्रयोगशील शेतकरी अनिल सोपान चव्हाण हे बंधू नंदकुमार व कुटुंबियांच्या मदतीने शेतात नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. अलीकडे संपूर्ण शेतीत सूक्ष्म सिंचनाचा वापर करून आधुनिक पद्धतीने नवनवीन भाजीपाला पिकांची बारमाही शेती चव्हाण कुटुंब करत आहे.
सूक्ष्म सिंचनाचा वापर करून कांदा पीक घेण्यासोबतच यंदा खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात मका पिकाची लागवड देखील चव्हाण यांनी ठिबक सिंचन पद्धतीनेच केली होती.
या सोबतच यंदा जानेवारी महिन्यात त्यांनी पपई लागवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र पपई दीर्घकालीन पीक असल्याने आणि दरम्यान झाडांच्या मधील क्षेत्र रिकामे राहत असल्याने त्यांनी खरबूजचे आंतरपीक घेतले.
पपई लागवडीसाठी तयार केलेल्या ५० गुंठे क्षेत्रावर तीन जानेवारी रोजी खरबूज पिकाची लागवड केली. ज्यात जैविक पद्धतीने खरबूज उत्पादन घेण्यासाठी त्यांना कृषि विभाग येवला यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तर औषधांचा खर्च आणि वापर कमी करण्यासाठी खरबूज पिकावर क्रॉप कव्हरचा वापर अतीशय फायदेशीर ठरला हेही विशेष.
... 'असे' आहे चव्हाण यांच्या आंतरपिकाचे अर्थकारण
• साधारणपणे खरबूज आणि पपई पिकासाठी एक लाख दहा हजार रुपये इतका खर्च आला. आंतरपीक असलेल्या खरबूज पिकाचे अवघ्या अडीच महिन्यांत उत्पादन हाती आले, ज्यात १७ टन एवढे खरबूज उत्पादन निघाले.
• प्रती किलो १७ रुपये दराने खरबूज पिकातून २,८९,००० एवढे उत्पन्न चव्हाण यांना मिळाले. तर दोन्ही पिकांचा खर्च वजा करता निव्वळ नफा १,७९,००० इतका झाला.
• दरम्यान संपूर्ण खरबूज खरेदी व्यापाऱ्यांनी शेतातूनच केल्यामुळे वाहतूक खर्चात बचत झाली. तर पारंपरिक पिकांच्या लागवडीपेक्षा नवीन आणि कमी कालावधीची पिके कमी पाण्यात जास्त नफा मिळवून देण्यासाठी निश्चितच चव्हाण यांना फायदेशीर ठरली.
आधुनिक शेती पद्धती, सूक्ष्म सिंचनाचा वापर, आणि आंतरपिक पद्धतीमुळे निश्चितच उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढविणे शक्य होते. तसेच क्रॉप कव्हरमुळे कीटकनाशकांचा अति वापर टाळता येतो, हे लक्षात घेऊन भाजीपाला पिकांमध्ये शेतकरी बांधवांनी त्याचा वापर केल्यास निश्चितच अधिक फायदा होऊ शकतो. - सोनाली कदम, कृषि सहाय्यक, आडगाव चोथवा. ता. येवला.
पारंपरिक पिके नेहमीच घेत असतो, पण शेततळ्यातील संरक्षित पाण्याचा वापर करून सूक्ष्म सिंचनाचा भाजीपाला पिकांमध्ये प्रभावी वापर करता येईल का, हे लक्षात घेऊन या वर्षी पपई आणि खरबूज पिकाची एकत्र लागवड केली. पपई पीक वाढीच्या अवस्थेत असतानाच अडीच महिन्यांत खरबूज पिकापासून लाखोंचा नफा मिळाल्याने यापुढे अजून नवीन प्रयोग करण्याचा मानस आहे. - अनिल चव्हाण, शेतकरी, कोटमगाव बु.
हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी