Join us

दुष्काळी माणमधील आंधळीचे शेतकरी अशोक शेंडे यांची केळी परदेशात निर्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 2:03 PM

दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात उपलब्ध पाण्यावर आणि मेहनतीच्या जोरावरही चांगले उत्पादन मिळू शकते, हे आंधळी, ता. माण येथील अशोक शेंडे यांनी केळी पिकातून दाखवून दिले आहे.

दुष्काळी भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात उपलब्ध पाण्यावर आणि मेहनतीच्या जोरावरही चांगले उत्पादन मिळू शकते, हे आंधळी, ता. माण येथील अशोक शेंडे यांनी केळी पिकातून दाखवून दिले आहे. आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये जी-९ या विकसित जातीची निवड करून वसई केळीची लागवड केली. लागवडीमध्ये पहिल्यादांच जुळी पद्धतीचा वापर केला. पाण्याचे ड्रीपने नियोजन केले. त्यामुळे सर्व रोपांना समान पाणी मिळाले व जुळ्या पद्धतीमुळे सपोर्ट म्हणून लागणारा निम्मा खर्च कमी झाला व एकमेकाला पट्ट्यांच्या साह्याने बांधण्यात आले.

सूर्यप्रकाश मिळावा म्हणून दोन बेडमधील आंतर १० फुटांचे ठेवण्यात आले. सुरुवातीपासूनच ही केळी परदेशात पाठवायची यासाठी सूक्ष्म नियोजन केले. एक एकरासाठी रासायनिक खत न वापरता शेणखत सेंद्रिय खत व कोंबडी खताचा वापर केला. मजूर न लावता जास्तीत जास्त काम हे कुटुंबांमार्फत केले, त्यामुळे खर्चही वाचला. सेंद्रिय खत चांगल्या पद्धतीने दिल्याने अवघ्या एका वर्षात ही बाग तयार झाली.

अधिक वाचा: ड्रॅगन फ्रूटची लागवड कशी केली जाते?

प्रत्येक झाडाच्या घडाला १५ ते १७ फण्या असतात; मात्र प्रत्येक घडाच्या शेंड्याकडील ३ ते ४ फण्या कट करण्यात आल्या. त्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी झाला. याशिवाय घड पोषणास मदत झाली. प्रत्येक घडाला ४० ते ४५ किलो माल उपलब्ध झाला. अंदाजे ४० टन मालाचे विक्रमी उत्पन्न तयार झाले. केळी या परदेशात इराकमध्ये गेल्याने त्यांना सरासरी ३१ रुपये किलोचा दर मिळाला आहे. एका एकरात अंदाजे १४ ते १५ लाख रुपये उत्पन्न निघाले. यासाठी कुटुंबाने स्वतः मेहनत घेतल्याने फक्त दीड लाख खर्च झाला.

या अगोदरही त्यांनी देशी व वसई केळीचे उत्पन्न तीन वेळा घेतले होते. मात्र २ रुपये, ६ रुपये ११ रुपये असा किलोला दर मिळाला होता. यावेळी ३१ रुपये मिळाला. इंदापूर येथील स्वप्नील चौधरी यांचे मार्गदर्शन घेऊन विक्रमी उत्पादन घेऊन परदेशात केळी पाठवण्यासाठी चांगल्या दर्जाचे उत्पन्न काढले. शेंडे हे कन्ट्रक्शनचा व्यवसाय करतात; परंतु शेतीची आवड असल्याने व कुटुंबासमवेत वेळ देऊन स्वतः कष्ट केले व शेती परवडत नाही म्हणणारे लोकांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण करून दिल्याने त्याचे अनेक लोकांकडून कौतुक होत आहे.

टॅग्स :केळीशेतकरीफलोत्पादनपीकफळेशेती