'कृष्णा' ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीने अनेकांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले आहेत. कृष्णाकाठी उसाची शेती होत असल्यामूळे कृष्णाकात सघन आणि संपन्न बनला आहे. याच कृष्णामाईने सातारा, सागली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागालाही साथ दिली आहे. कृष्णेचे पाणी दुष्काळी भागातील शेतकऱ्याचे भाग्य बदलत आहे आणि याचे श्रेय टेंभू योजनेला जाते.
कऱ्हाड तालुक्यातील टेंभू गावाजवळ कृष्णा नदीवर टेंभू उपसा सिंचन प्रकल्प साकारला गेला आणि दुष्काळी जनतेला आनंदाचे दिवरा येऊ लागले. या योजनेची सुरुवात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना इाली. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात या मूळ प्रकल्पाला मान्यता मिळाली. १९ फेब्रुवारी १९९६ रोजी या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर १७ ऑगस्ट २००७ रोजी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पाला मान्यता दिली. आणि अखेर केंद्र शासनाच्या नियोजन विभागाने ३४५०,३५ कोटी रुपये निधीला १ जुन २०११ रोजी मान्यता देऊन प्रकल्पाला गती दिली.
या प्रकल्पाअंतर्गत तीन जिल्ह्यांतील एकूण ८० हजार ४७२ हेक्टर शेतजमिनीला लाभ मिळत आहे. या योजनेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांतील दुष्काळी तालुके आहेत. ही योजना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्याच्या टेंभू गावात साकारली असली, तरी सातारा जिल्ह्यातील लाभक्षेत्र सर्वांत कमी आहे. सातारा जिल्ह्यात फक्त ६०० हेक्टर जमिनीसाठी याचा लाभ झाला आहे. तर सांगली जिल्ह्यातील ५९ हजार ८७२ हेक्टर शेतजमिनीला लाभ मिळाला आहे. सर्वाधिक लाभक्षेत्र सांगली जिल्ह्यात आहे. तर सोलापूर जिल्ह्याला २० हजार हेक्टर शेतजमिनीला या योजनेचा लाभ पोहोचविला जात आहे. या तीन जिल्ह्यांतील २१३ गावे कृष्णामाईच्या पाण्याने विकासावर आरूढ होत आहेत. तीनही जिल्ह्यांतील सात तालुक्यांना या योजनेचा लाभ होत आहे.
सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली जिल्ह्यांतील कडेगाव, खानापूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि सोलापुर जिल्ह्यातील सांगोला असे हे तालुके आहेत. कऱ्हाड तालुक्यातील सहा गावातील ६०० हेक्टर, सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील ३५ गावांतील ९ हजार ३२५ हेक्टर, खानापूर तालुक्यातील ४५ गावांतील १८ हजार १७५ हेक्टर, तासगाव तालुक्यातील २६ गावांतील ७ हजार ७०० हेक्टर, आटपाडी तालुक्यातील ४८ गावांतील १६ हजार हेक्टर, कवठेमहांकाळ तालुक्यातील २१ गावांतील ७ हजार ८७२ हेक्टर आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील ३२ गावांतील २० हजार हेक्टर क्षेत्राला याचा लाभ मिळत आहे. टेंभू प्रकल्पामुळे एकूण २१३ गावांतील ८० हजार ४७२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
अधिक वाचा: जाणून घ्या, कोयना धरण उभारणीपासून ते लेक टॅपिंगपर्यंतचा प्रवास
या सर्व शेतजमिनींसाठी टेंभू योजनेतून पाणी उचलून कालव्याद्वारे पुरविले जात आहे, त्यामुळे दुष्काळी भागात सुखाचे दिवस आले आहेत. या योजनेत असणारे सर्व तालुके हे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेले तालुके होते, येथील शेतकऱ्यांना भरपूर जमीन होती; मात्र बेभरवशी पावसामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेती करणे कठीण झाले होते. हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जाताना पाहावे लागत होते. त्यामुळे मागास आणि गरीब तालुके अशीच या तालुक्यांची शासनदरबारी नोंद होती. भरपूर जमीन असूनही येथील लोकांना मुंबई, पुणे येथे नोकरीसाठी जावे लागत होते. ही परिस्थिती बदलणे गरजेचे होते.
कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक योजना गतिमान झाल्या त्यामध्ये टेंभू योजना ही महत्त्वाची योजना आहे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांनी महाराष्ट्राच्या समाजाला जशी दिशा दिली, तसेच काम त्यांच्या जन्मगावी म्हणजे टेंभू येथे साकारलेल्या टेंभू उपसा सिंचन योजनेने दुष्काळी जनतेला साथ देऊन केली आहे
दुष्काळी भागातील लोक हे जन्मजात मेहनती लोक आहेत, प्रचंड परिश्रम करण्याची क्षमता या लोकांमध्ये आहे. दारी कृष्णा आल्यावर या लोकांमध्ये आनंदाबरोबरच नवीन उत्साह संचारला आणि येथील शेती बहरू लागली.
जिरायती शेतीसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग वागायती कधी झाला, हे समजलेच नाही. सध्या या भागात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. ऊस हे टेंभू योजनेवरील महत्त्वाचे पीक आहे, उसाबरोबरच डाळिंब, हळद, केळी, द्राक्षाचे उत्पादनही या पाण्यावर घेतले जाते, काही साखर कारखानेही या भागात सुरू झाले आहेत. त्यामुळे दुष्काळी भागाचे भाग्य बदलले आहे. कृष्णा अंगणी आली आणि आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला या भागातील जनजीवन आणि अर्थकारण बदलले. खरोखरच टेंभू योजना साकार झाली आणि बांधाबांधांवर पाणी पोहोचले. दुष्काळी तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाले.
संदीप कोरडे
ओगलेवाडी