लक्ष्मण सरगरआटपाडी : माणदेश जसा कणखर तसाच मृदूही, कणखर त्याची माती.. कष्टाने कमवलं तर सोनं करणारी, नाहीतर देणं वाढवणारी, याच माणदेशातील शेटफळे या ऐतिहासिक गावातील डाळिंबांनी रशियाच्या बाजारपेठेला भुरळ घातली आहे. रशियाच्या नास्या स्विम, ओला स्विम, मॅक्स स्विम, कृषितज्ज्ञ कलिमा नदाफ, जावेद नदाफ यांनी शेटफळे येथील शिवेच्या मळ्यात ७४ वर्षाचे शेतकरी शिवाजीराव सखाराम गायकवाड यांच्या निर्यातक्षम डाळिंबबागेस भेट देऊन डाळिंब पिकाची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी रशियन शेती व तेथील शेतकरी याबाबत माहिती दिली. भारतामध्ये व विशेषतः कमी पाण्यामध्ये पिकवले जाणाऱ्या डाळिंब बागांबाबत कुतूहल व्यक्त केले. शिवाजी गायकवाड यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सेंद्रिय शेती पिकवली आहे. याच शेतीत त्यांनी लावलेली सेंद्रिय डाळिंबाची बाग पाहण्यासाठी रशियातील काही शेतकरी मंडळी शेटफळेतील शिवेच्या मळ्यात दाखल झाली. प्रत्यक्षात डाळिंब बाग पाहून ते भारावून गेले, यावर त्यांनी 'युवर ग्रॅनाईट मोर टेस्टी अँड मोर अॅक्ट्रक्टिव' असे तोंड भरून कौतुकही केले.
अधिक वाचा: इस्रायल पॅटर्नची कमाल; पाणी लागेल कमी, भरघोस सीताफळं पिकण्याची हमी
हिरव्यागार बागेत लालभडक रंगाची ६०० ते ७०० ग्रॅम वजनाची फळे पाहून त्यांनी यासाठी काय काय करता अशी विचारणा केली. गायकवाड यांच्या कष्टाचे वर्णन ऐकल्यानंतर रशियन कृषितज्ज्ञ मॅक्सिम यांनी त्यांच्या जिद्दीला आणि कष्टाला सलाम केला. ओला स्विम या कृषी चिकित्सकाने भारतीय शेतकऱ्यांना विशेषतः डाळिंब शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी गायकवाड म्हणाले, परिसरातील डाळिंब शेतकऱ्याच्या कष्टास योग्य मोबदला देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.
यावेळी रशियन डाळिंब तज्ज्ञांनी यासाठी नक्कीच प्रयत्न करू व गायकवाड आणि त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या कष्टांना योग्य तो सन्मान करण्याचे अभिवचन दिले. यावेळी शिवाजीराव गायकवाड यांचे चिरंजीव धनाजी गायकवाड, ईशान नदाफ, आबासाहेब देवकुळे, अधिकराव गायकवाड उपस्थित होते. यावेळी रशियन कृषितज्ज्ञ व शेतकऱ्यांनी माणदेशी जेवणाचा आस्वाद घेतला.
एका एकरमध्ये साधारणपणे तीनशे झाडे, असे दीड एकरमध्ये माझी सध्या ४५० डाळिंबाची झाडे आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बाग धरली जाते. सुरुवातीपासून डाळिंब बाजारला नेईपर्यंत एकूण ६५ ते ८० हजार खर्च आला आहे. तर आतापर्यंत सात लाख उत्पन्न मिळाले असून अजून एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळण्याची आशा आहे. - शिवाजीराव गायकवाड, डाळिंब उत्पादक शेतकरी, शेटफळे