शाश्वत उत्पन्न, अनुदानाची तरतूद यामुळे तरुण शेतकरी आता रेशीम शेतीकडे वळत आहेत. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील अभियंता असलेला चंद्रशेखर काळे याने रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळविले आहे. त्यासाठी चार लाखांपर्यंत अनुदान मिळण्याची सुविधा आहे. रेशीम उद्योग वाढीसाठी अनेक सोयी व सवलती मिळत असून कांदा, फलोत्पादन, भुसार पिके, भाजीपाला या शेतीला एक चांगला पर्याय म्हणून सध्या अनेक तरुण शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहेत. यात कीटक संगोपनगृहासाठीही अनुदानाची तरतूद असल्याचे रेशीम विकास अधिकारी एम. ए. कट्टे यांनी सांगितले.
बदलते हवामान, बाजारातील शेतीमालाच्या बाजारभावाची हमी नाही. वाढणारी महागाई यामुळे पारंपरिक शेतकऱ्यांना शेती उद्योग परवडत नाही. पारंपरिक शेती व्यवसाय शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी अपयशी ठरत आहे. शेती व्यवसायापासून अनेक शेतकरी दूर जात आहेत. त्यामुळे काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाव्यतिरिक्त एकात्मिक शेतीचा विचार करणे गरजेचे आहे.
इतर साहित्यरेशीम शेती करण्यासाठी लागणारे इतर साहित्यासाठी ३२ हजार रुपये अनुदान असून, असे एकूण ३ लाख ९५ हजार ३३५ रुपये अनुदान ३ वर्षासाठी आहे. म्हणजेच रेशीम शेतीसाठी जवळपास चार लाख अनुदान मिळू शकते, असे रेशीम विकास अधिकारी कट्टे यांनी सांगितले.
कशासाठी किती अनुदान?लागवड: तुती लागवडीसाठी कमीत कमी एक एकर व जास्तीत जास्त पाच एकर प्रतिलाभार्थी क्षेत्र मर्यादा निश्चित केली आहे. त्यानुसार शेतकरी अनुदानास पात्र ठरतील. एक एकर तुती लागवड, संवर्धन व कोष उत्पादनासाठी २ लाख १८ हजार १८६ रुपये अनुदान मिळते.मजुरी: तुती लागवड, जोपासना, संवर्धन व कीटक संगोपन करण्यासाठी ६८२ मनुष्य दिवस तसेच कीटक संगोपनगृह बांधकामासाठी २१३ मनुष्य दिवस, मजुरी दर २७३ रुपये अकुशलसाठी २ लाख ४४ हजार ३३५ रुपये मिळतील.कीटक संगोपनगृह: रेशीम कीटक संगोपनगृहासाठी शेड करता ५० बाय २२ फुटांच्य संगोपनगृह उभारणीसाठी १ लाख ७९ हजार १४९ रुपये अनुदान मिळणार आहे.
रेशीम शेतीचे महत्त्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी आगामी वर्षात तुती लागवड करण्यासाठी इच्छुकांची नाव नोंदणी करण्यासाठी २० नोव्हेंबरपासून राज्यात महारेशीम अभियान राबविण्यास सुरुवात झाली आहे. - गोरक्ष गाडीलकर, संचालक, रेशीम संचालनालय.