घरगुती जेवण असो वा हॉटेलमधील भोजनाचा बेत असो, सर्वच ठिकाणी आता गावरान चिकनला मागणी होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खुराड्यातील कुक्कुटपालनाला चांगले दिवस आले आहेत. अनेक शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ खुराड्यातील कोंबडीच्या उत्पन्नावर चालतो आहे. सोलापूर जिल्ह्यातील मेंढापूर येथील रुक्मिणी काशिनाथ माने यांनाही घरगुती कुक्कुटपालन व्यवसायामुळे चांगली साथ दिली आहे.
राज्यात या आठवड्यात मुसळधार; वाचा कुठल्या जिल्ह्यात कसा कोसळणार?
दोन कोंबड्यांपासून सुरुवात
रुक्मिणी माने यांची ‘मान्याची भाभी’ म्हणून मेंढापूर परिसरात खास ओळख निर्माण झाली आहे. त्यांना तीन मुले आहेत. ते २००३ चे साल होते. भयाण दुष्काळ पडला होता. एक ते दीड एकर बागायत शेतीवर माने यांचे कुटुंब गुजराण करत होते. कुटुंबाचा खर्च पेलवत नव्हता म्हणून त्यांनी स्वतःची शेती विकून त्या पैशात माळरानावर सुमारे १२ एकर कोरडवाहू शेतजमीन खरेदी केली आणि शेतीचा विस्तार केला. पेनूर-भोसे रस्त्यालगत ही शेती मिळाल्याचा त्यांना चांगला फायदा झाला. त्यावेळी माने यांच्या कुटुंबात आठवड्याला चार-पाच वेळा तरी मांसाहारी भोजन व्हायचे. त्यात बहुतांश करून देशी कोंबडी व अंड्याचा समावेश होता. तेव्हा स्वस्ताई जरी असली तरी त्यांचा कोंबडी व अंड्यावर बराच खर्च होत होता. आपला बराच खर्च अंडी व कोंबडी खरेदी करण्यात होत असल्याने रुक्मिणी माने यांनी नवीन खरेदी केलेल्या माळरानाच्या शेतात कोंबड्या पाळण्याचे निश्चित केले. यात त्यांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला नव्हता; पण आपल्या कुटुंबाची गरज म्हणून त्यांनी दोन कोंबड्यांवर त्यावेळी घरगुती कुक्कुटपालन सुरू केले. आज त्यांच्याकडे १०० ते २०० कोंबड्या कायम असतात.
बन्ने गुरूजींनी ५० गुंठ्यात केला १०० टन ऊस; कमावले तीन लाख
वर्षाकाठी ७० ते ८० हजार रुपये
माने यांचे शेत रस्त्यालगत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय भरभराटीस येण्यासाठी चांगलाच फायदा झाला आहे. हॉटेल व्यावसायिक तसेच घरगुती ग्राहकही त्यांच्याकडे अंडी, कोंबडी व कोंबडा खरेदी करण्यासाठी थेट येतात. यामुळे त्यांना अंडी अथवा कोंबड्या विक्रीसाठी बाजारात कधीच जावे लागत नाही. कोंबड्यांची विक्री करत असताना पुढे त्यांची वाढ चालू राहण्यासाठी घरात दोन ते तीन कोंबड्या नेहमीच अंड्यावर बसविलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्याकडे आलेला ग्राहक कोंबडी अथवा अंडी मिळाली नाहीत म्हणून कधीच माघारी गेला नाही. गावरान कोंबडी हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे माने अशी त्यांची ओळख झाली आहे.
या गावरान कोंबडीचे अंडे सध्या पाच रुपये प्रतिनग, एक ते सव्वा किलोची कोंबडी २०० ते २५० रुपये, तर कोंबडा ३०० ते ३५० रुपये प्रतिनग याप्रमाणे विकला जातो. वर्षातील चैत्र व श्रावण हे दोन महिने वगळून इतर सर्व महिन्यांमध्ये अंडी व कोंबड्यांना जास्त मागणी असते. त्यामुळे माने यांना या व्यवसायातून दररोज किमान ५०० रुपये तरी उत्पन्न मिळते. जत्रेच्या दिवशी किमान ५ ते ६ हजार रुपयांच्या मालाची विक्री होते. त्यामुळे वर्षाकाठी सर्व खर्च वजा जाता ७० ते ८० हजार रुपये निव्वळ नफा कुक्कुटपालन व्यवसायातून होतो. खर्च फारसा होत नसला तरी कोंबड्यांना रोज किमान दोन शेर धान्य लागते, असे माने यांनी सांगितले.
'या' निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोजावे लागणार खतांसाठी अधिक पैसे
कोंबड्यांचे व्यवस्थापन असे होते
रुक्मिणी माने यांनी कुक्कुटपालनासाठी खुराडे (खुरूडे) केले होते; पण कोंबड्यांची पिल्ले मोठी झाली की, त्यांना झाप पुरेसा होत नव्हता म्हणून त्यांनी मोठ्या कोंबड्यांसाठी लोखंडी जाळीचे रॅक तयार करून घेतले आहे. यात सुमारे १०० कोंबड्या आरामात बसतात. या रॅकचा वापर केवळ रात्री केला जातो. दिवसभर या कोंबड्या परसबागेत हिंडून खात असतात. पाणीही दंडात साठलेलेच पितात. स्वच्छ व हवेशीर ठिकाण असल्यामुळे त्यांच्या कोंबड्यांना आतापर्यंत कोणताही रोग आला नाही. त्यामुळे त्यांना हा व्यवसाय ङ्गायदेशीर ठरला आहे.
शेतीला पशुसंवर्धनाची जोड
रुक्मिणी माने यांना १२ एकर शेती आहे. त्यात त्यांनी सव्वाचार एकर बोरीची बाग लावली आहे. दोन एकर ऊस, अर्धा एकर घेवडा, अर्धा एकर शेवगा, अर्धा एकर हरभरा व एक एकर क्षेत्रात गव्हाची लागवड त्यांनी केली आहे. १० शेळ्या व लहान-मोठी मिळून १२ जनावरे सांभाळली आहेत.
कुक्कुटपालन व्यवसायातून रोज मिळते पाचशे रुपयांचे उत्पन्न
माने भाभींच्या तीनही मुलांचे लग्न झाले आहे. त्यांचे एकूण १३ माणसांचे कुटुंब आहे. केवळ कुक्कुटपालन व्यवसायावर या कुटुंबाचा चरितार्थ व्यवस्थित चालत आहे. त्यामुळे शेतीतील उत्पन्न शिल्लक राहते. प्रसंगी माने भाभी शेतीतील काही नडीच्या कामांसाठी कुक्कुटपालन व्यवसायातील उत्पन्न देतात. याबाबत त्यांनी एक प्रसंग सांगितला, तो असा एकावर्षी शेतात नवीन विहीर खोदण्याचे काम सुरू होते. आठवडी बाजाराच्या दिवशी मजुरांच्या पगाराची जुळणीच झाली नाही. बाजारासाठी मजुरांचे पगार करणे आवश्यक होते. त्यावेळी माने भाभींनी कुक्कुटपालन व्यवसायातील उत्पन्नातून मजुरांचा एक आठवड्याचा पगार (सुमारे १० हजार रुपये) दिला. त्यावेळी मजुरांसह त्यांची मुलेही अवाक् झाली. अशी छोटी-मोठी कामे करण्यासही कुक्कुटपालन व्यवसायाचा त्यांना चांगलाच फायदा होत आहे. शेतीतील कोणतेही काम नडले की, त्यांच्या मुलांना भाभींची आठवण येते. भाभींच्या घरी एक टेम्पो, जीप, ट्रॅक्टर व दोन मोटारसायकली आहेत. कुक्कुटपालन व्यवसायातून माने भाभींना दररोज किमान पाचशे रुपये उत्पन्न निश्चित मिळते. यासाठी त्यांना फारशी गुंतवणूक करावी लागली नाही. त्यांचा हा बिगरभांडवली कुक्कुटपालनाचा धंदा तेजीत आहे.
उलट्या पंखाच्या कोंबड्यांमुळे उत्पन्नात भर
रुक्मिणी माने भाभींकडे उलट्या पंखाच्या कोंबड्यांची आपोआप पैदास झाली आहे. याचा त्यांना सर्वांत जास्त ङ्गायदा होत आहे. उलट्या पंखाचा कोंबडा अतिदुर्मिळ असून, तो उतारा करण्यासाठी लागतो व सध्या असा कोंबडा मिळणे अवघड बनले आहे. माने यांच्याकडे या उलट्या पंखाच्या कोंबड्या उपलब्ध असून, अशा कोंबड्यांसाठी त्यांना प्रतिनग दीड ते दोन हजार रुपये दर अगदी सहजच
मिळत आहे. उलट्या पंखाच्या कोंबड्यांमुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडली आहे.