जालिंदर शिंदे
कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतकरी श्रीकांत फाकडे यांच्या शेतातील बाजरीच्या पिकाला चक्क तीन फूट उंचीची कणसे आली आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजरीच्या उत्पादनात चांगलीच भर पडणार आहे.
श्रीकांत फाकडे यांची गावच्या पूर्वेस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कोरडवाहू अशी शेती आहे. यावर्षी त्यांनी तुर्कस्थान येथील प्रती किलो १५०० रुपये दराने बाजरीचे बियाणे ऑनलाइन मागवले. त्यांनी एकरी एक किलो याप्रमाणे एक एकर क्षेत्रात बियाण्याची पेरणी केली.
पावसाच्या भरवश्यावर, कोरडवाहू क्षेत्रात, कमी पाण्यावर ह्या बियाण्याची दोन फुटावर एक बी अशा पद्धतीने पेरणी केली. सध्या बाजरीचा पेरा करुन दोन महिने पूर्ण झाले आहेत.
बाजरीच्या पिकांच्या ताटाची उंची सरासरी आठ फूट तर त्याला आलेल्या कणसांची उंची ही तीन फुटांपर्यंत आहे. तीन महिने पूर्ण झाल्यानंतर बाजरी पीक परिपूर्ण झाल्यानंतर काढणी होणार आहे.
उत्पन्नात होणार वाढ
या उच्च प्रतीच्या बियाणामुळे बाजरी उत्पन्नात वाढ होणार आहे. अशा प्रकारच्या उच्च जातीच्या बियाणाचे आपल्या देशात उत्पादन झाल्यास शेती, शेतकरी यांच्यात प्रगती होऊन हरितक्रांतीस मदत होणार असल्याचे मत शेतकरी श्रीकांत फाकडे यांनी यावेळी व्यक्त केले.
अनेक शेतकऱ्यांचा प्रयोग
मागील एक दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी तुर्कस्थानमधील बाजरीचे बियाणे पेरत आहेत. या बाजरीसाठी सामान्य बाजरीप्रमाणेच मशागत, पीक व्यवस्थापन करावे लागते. एकरी ३५ ते ५० क्विंटल उत्पादन मिळते असा दावा केला जात आहे.