सूर्यकांत किंद्रेवेनवडी (ता. भोर) येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब मारुती कुमकर यांनी पारंपरिक भात शेतीला फाटा देत लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचीशेती यशस्वी केली आहे.
महाराष्ट्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात रासायनिक खतांचा, औषधांचा वापर करून या नगदी पिकाने शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे. १५ गुंठे क्षेत्रात पॉलीहाऊस बांधून लाल आणि पिवळ्या रंगाच्या सिमला मिरचीचे उत्पादन घेत आहेत.
मिरचीच्या लागवडीपूर्वी १५ ट्रॉली शेणखत मिसळले बेसल डोस देताना निंबोळी पेंड ३०० किलो, ह्युमिक्रिस २०० किलो, क्रोमा २०० किलो, बेनसल्फ १० किलो, ह्युमिक दाणेदार १० किलो, बायोझाईम ८ किलो, सी गोल्ड १० किलो, महाफीड कॉम्पलेक्स २५ किलो, मायकोराइझा ४ किलो, ट्राय कोडमी ४ किलो यांचे मिश्रण करून बेड मध्ये मिसळले.
बेडची उंची १ फूट, रुंदी ३ फूट, दोन बेड दरम्यान अंतर १ फूट ठेवले. बेसल डोस दिल्यानंतर एक दिवस ठिबकद्वारे बेड भिजवून दुसऱ्या दिवशी मल्चिंग पेपर अंथरुण झिगझॅग पद्धतीने छिद्र पाडून रोपांची लागण केली.
लागवडीनंतर ७० दिवसांनी रंगीत ढोबळी मिरचीची काढणी सुरु झाली. त्यांच्या जाती आणि रंगानुसार प्रतवारी करून पुणे येथे विक्री केली जाते. पॉलीहाऊसमध्ये तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश नियंत्रित होत असल्याने भरपूर उत्पादन व उच्च प्रतीची फळे मिळत असल्याने १०० ते १२० रुपये किलो भाव मिळतो.
औषधी उपयोग- रंगीत ढोबळी मिरचीचे औषधी उपयोग पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची उपयुक्त आहे.- १०० ग्रॅम ताज्या रंगीत ढोबळी मिरची फळामध्ये जीवनसत्त्व अ, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम (१.४ मिलीग्राम), मॅग्नेशियम (१.९ मिलीग्राम), फॉस्फरस (२.३ मिलीग्राम), आणि पोटॅशियम (२.३ मिलीग्राम) चे प्रमाण असते.