पुणे : परदेशातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पुण्यातील प्रतिक्षा शेळके या तरूणीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांबू आणि इतर लाकडापासून दैनंदिन वापरातील वस्तू बनवून विक्री करण्यास सुरूवात केली. एकीकडे सरकार बांबू लागवडीला प्रोत्साहन देत असताना बांबूपासून वस्तू बनवून प्रतिक्षा लाखोंची उलाढाल करत आहे. तिच्या व्यवसायातून १२ ते १५ लोकांना रोजगाराची निर्मिती झाली आहे.
पुण्यासारख्य शहरात शिकलेली, वाढलेली आणि परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलेली प्रतिक्षा. तिने पुण्यातील महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी यूएसला गेली. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिथेच जीप आणि बीएमडब्ल्यू या कंपन्यांत नोकरी केली. पण तिला इको फ्रेंडली वस्तू बनवण्याची जास्त आवड होती. त्यामुळे नोकरी करता करता आपल्याला इको फ्रेंडली वस्तू बनवण्याच्या हेतून ती २०२० साली भारतात परत आली.
भारतात आल्यानंतर प्रतिक्षाने पुण्यातील शिवणे भागात प्रत्यक्ष लाकूड आणि बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा कारखाना सुरू केला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून अनुदान मिळवून त्यांनी आपला व्यवसाय उभारला. तयार केलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी त्यांनी जंगल बाऊंड हा ब्रँड सुरू केला. याच ब्रँडच्या नावाने लाकूड आणि बांबूपासून बनवलेल्या सर्व वस्तू विक्री होत आहेत.
दैनंदिन वापरातील वस्तू
ऑफिसमध्ये लागणाऱ्या वस्तू, घरात दैनंदिन वापरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, हॉटेल, कॉर्पोरेट क्षेत्रात भेट देण्यासाठी, ट्रॉफी, लॅपटॉप स्टँड, मोबाईल स्टँड, मोबाईल स्पिकर अशा अनेक वस्तू या कारखान्यात बनवल्या जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या वस्तू डिझाईन करूनही विक्री केल्या जातात.
कशा बनवल्या जातात वस्तू?
सर्वांत आधी कोणती वस्तू बनवायची आहे याची डिझाईन तयार केली जाते. त्यानंतर मशीनद्वारे ज्या त्या डिझाइन प्रमाणे लाकूड कट केले जाते. त्यानंतर लोगो, टेक्स्ट छापून घेतला जातो. गरजेप्रमाणे कटिंग, फिनिशिंग आणि पॉलिश केल्यानंतर प्रोडक्ट तयार होतो.
रोजगाराची निर्मिती
त्यांच्या या व्यवसायातून त्यांनी १० ते १२ लोकांना व्यवसायाची निर्मिती करून दिली आहे. मागच्या पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्याकडे सहा ते सात महिला आणि चार ते पाच पुरूषांना रोजगार मिळत आहे.
व्यवसायातील संधी
राज्य सरकारकडून सध्या बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. तर शेतकरीही बांबू लागवडीकडे वळताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात बांबूपासून बनल्या जाणाऱ्या वस्तूची मागणी वाढेल. त्यामुळे बांबू किंवा लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्यामध्ये संधी आहेत.
सोशल मीडियाचा वापर करून मालाची विक्री
तयार केलेल्या वस्तू विक्री करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. त्याचबरोबर वेबसाईटच्या माध्यमातून अनेक लोकं वस्तू खरेदी करतात. एखाद्या संस्थेला किंवा कंपनीला जास्त मालाची गरज असल्यामुळे एकाच वेळी जास्त वस्तूंची ऑर्डर येते. दरम्यान, बांबूपासून बनवलेल्या इको-फ्रेंडली वस्तूंचे प्रदर्शन असेल तर तिथेही 'जंगल बाऊंड'च्या वस्तूंची ब्रँडिंग केली जाते.
उत्पन्न
मागील चार वर्षांपासून सुरू केलेला व्यवसाय आता वेगळ्या उंचीवर जाऊन ठेपला आहे. तर चालू वर्षामध्ये जंगल बाऊंडने ३० लाखांपेक्षा जास्त उलाढाल केली आहे. दिवसेंदिवस लोकांचा पर्यावरण पूरकतेकडे वाढता कल पाहता या वस्तूंची मागणीही वाढत असल्याचं प्रतिक्षा सांगते.
येणाऱ्या काळात हा व्यवसाय आणखी वाढवायचा असून प्रत्येक लोकांच्या घरात पर्यावरणपूरक वस्तू पोहोचवायच्या आहेत हे ध्येय प्रतिक्षाने बाळगले आहे. परदेशातील नोकरी सोडून भारतात येत पर्यावरणपूरक वस्तू बनवण्याचा व्यवसाय प्रतिक्षाने यशस्वी करून दाखवलाय. तिच्या जिद्दीला आणि कार्याला सलाम...