अव्वलगाव तालुका वैजापूर जिल्हा छ्त्रपती संभाजीनगर येथील नवनाथ गायकवाड यांना बाजाठाण (तालुका वैजापूर) शिवारात दहा एकर क्षेत्र. शेताच्या बाजूनेचं गेलेली गोदावरी त्यामुळे मुबलक प्रवाही सिंचन. पण गेल्या दोन चार वर्षांपासून अपेक्षित पाऊस नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपरिक कपाशी, कांदा, मका, पिकांतून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. ज्यामुळे सतत चिंता असायची. यावर मुलगा आदिनाथ याने प्रायोगिक तत्वावर २०२१ मध्ये एक एकर क्षेत्रात जि९ या जातीच्या १४०० टिशू कल्चर रोपांची ६.५×५ फूट अंतरावर केळी लागवड केली.
मर्यादित रासायनिक खतांचा वापर करत, सेंद्रिय खतांचा अधिक वापर करणारे नवनाथ गायकवाड यांनी केळीला देखील सेंद्रिय पद्धतीने वाढविण्याचा प्रयत्न केला. ज्यातून सुरुवातीला एकरी ४ ट्रॉली शेणखत दिले. त्यानंतर दाणेदार खतांचा एक भेसळ डोस व काही बुरशीनाशक फवारणी घेत त्यांनी केळी संगोपन केले ज्यातून पहिल्याच वर्षी त्यांना २७ टन उत्पादन मिळाले. मात्र राज्यभर सर्वत्र केळी हंगाम जोमात असल्याने त्या वर्षी दर कमी मिळाला. जागेवर ५ रुपये किलो या प्रमाणे त्यांनी विक्री केली. ज्यातून खर्च जाता सरासरी ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळाले. ज्यात कपाशी सारखी मजुरांची गरज भासली नाही हे विशेष. या वर्षी पाऊस कमी असल्याने सध्या केळींना घडांची संख्या कमी आहे. मात्र तरीही दर चांगले असल्याने ती उणीव भरून निघेल अशी अपेक्षा गायकवाड यांना आहे.
बाजारभाव गणित व केळी का फायद्याची ?
लागवड खर्च पहिल्या वर्षी अधिक त्यानंतर मात्र फक्त व्यवस्थापन. वादळ वारा असतांना घडांना ताण देऊन बाजूच्या झाडाला बांधले जाते. ज्यामुळे नुकसानीची हानी कमी होते. कपाशी व इतर पिकांनामध्ये औषधी खर्च, मजूर हे अधिक प्रमाणात आहे. त्यातुलनेत केळीला मुबलक पाणी असेल तर फक्त शेणखत गरजेचे असते. एकरी अवघा ३ ते ५ क्विंटल कापूस निघतो ज्यातून जेमतेम २० ते २५ हजार येतात खर्च जाता किती राहतात हे हिशोब करायलाचं नको ! त्यातुलनेत खर्च जाता केळी मधून अधिक उत्पन्न मिळत आहे.
- नवनाथ रंगनाथ गायकवाड
मित्रांचा सल्ला ठरला उपयोगी
नाशिक येथे महाविद्यालयात असतांना उत्तर महाराष्ट्रातील काही मित्रांकडून सतत केळी पिकांबाबत माहिती मिळायची ज्यातून आपणही हा प्रयोग करू असे वाटले. आज कपाशीच्या तुलनेत केळी फायद्याचे असल्याचे अनुभव मी घेत असून भविष्यात संपूर्ण क्षेत्रात केळी करण्याचा माझा मानस आहे.
- आदिनाथ नवनाथ गायकवाड