अनिल महाजन
बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील आरणवाडी सारख्या डोंगराळ भागात शेती करणाऱ्या सुनील लक्ष्मणराव शिनगारे नामक तरुण शेतकऱ्याने यंदा केळी बागेतून २२ लाख रुपयांचे उत्पन्न घेण्याचे धाडस करीत जोपासना करीत आहे. कृषीतज्ज्ञाचे योग्य मार्गदर्शन, नवीन तंत्रज्ञानाची साथ व योग्य मेहनतीचे सूत्र जुळवित मागील दोन वर्षांपासून सुनीलने या भागातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श ठेवला आहे. मिरची, फुलकोबीच्या उत्पादनानंतर आता केळी उत्पादन तो घेत आहे.
शेतकरी सुनील शिनगारे याने धारूर कृषी विभागातील कृषी सहायक श्रीनिवास अंडील यांचे मार्गदर्शन घेत डोंगराळ भागातील शेतात दोन वर्षांपासून पिकांचे नवनवीन प्रयोग करत आहेत. याआधी त्याने तीन एकर हिरवी मिरची लागवड केली आणि १२३ मेट्रिक टन एवढे हिरव्या मिरचीचे उत्पादन घेतले. त्यानंतर या क्षेत्रावर त्याने फुलकोबीतूनही चांगले पैसे मिळवले.
दोन पिके घेतल्यानंतर चालू वर्षात २८ जानेवारी रोजी तीन एकरांत केळीची ३५०० रोपे आणून ७ बाय ५ अंतरावर लागवड केली. यासाठी त्यांनी जैन टिशू कल्चर या वाणाची निवड केली. लागवडीआधी त्याने जमिनीची योग्य मशागत करून शेणखत व रासायनिक खत टाकून रोप लावण्यासाठी बेड तयार केले. रोप लावणीनंतर पंधरा दिवसांच्या अंतराने खतांच्या आळवण्या केल्या. या रोपांवर करपा रोगाची लक्षणे दिसतारच कॉपर ऑक्सिसाइड व स्टेप्टोसायक्लिन या बुरशीनाशक फवारले.
सध्या केळीचे पीक सहा महिन्यांचे झाले असून, वाढदेखील अपेक्षेपेक्षा चांगली झाली आहे. साधारण केळीच्या झाडांची उंची २० फुटांपर्यंत गेली आहे. केळीचे उत्पादन निघण्यासाठी अजून सहा महिन्यांचा कालावधी बाकी आहे. निसर्गाने साथ दिली तर हा शेतकऱ्याचा हा प्रयोग यशस्वी होईल.
नवीन पिके घेऊन उत्पादन वाढवा
पारंपरिक पिके वगळून नवीन पिके घेताना नवीन तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन वाढवता येते, हे मिरची, कोबी व आता केळीचे उत्पादन घेऊन दाखवून दिले आहे. तरुण शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेत नगदी पैसे देणाऱ्या पिकांवर भर द्यावा. - सुनील शिनगारे, प्रगतशील शेतकरी, आरणवाडी.
तीन लाखांचा खर्च
सुनील शिनगारे यांच्या बागेतील झाडाची प्रगती पाहता त्यांना तीन एकर केळीमधून १८० मेट्रिक टन उत्पादनाचा अंदाज आहे. केळी बागेवर आतापर्यंत सरासरी सर्व खर्च तीन लाख रुपये केले असून, २२ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळणार, अशी अपेक्षा आहे.
आधुनिक तंत्रज्ञान, पद्धती वापरा
तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कापूस, ऊस, सोयाबीन या पारंपरिक पिकांना फाटा देत आपल्या शेतात कमी खर्चात आधुनिक पद्धतीने नवनवीन पिके घ्यावीत, असे आवाहन कृषी सहायक श्रीनिवास अंडील यांनी केले आहे.