मारोती कदम
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पारंपरिक पिके घेऊनही म्हणावा तसा भाव मिळत नाही. हे पाहून केळीची लागवड केली. केळीचा (Banana) दर्जा पाहून केळीला इराककडून मागणी आली. केळीला भाव चांगला मिळाल्यामुळे केळी इराकला पाठविली आहे. यातून केळी उत्पादक शेतकऱ्यास ३ लाख रुपयांचा नफा झाला आहे.
दोन वर्षांपासून पारंपरिक पिके न घेता केळी व इतर फळांची लागवड सुरू केली आहे. गतवर्षी केळीला ८०० क्विंटल एवढा भाव होता. यावर्षीही ८०० रुपये एवढाच भाव मिळत आहे. परंतु हिंगोली जिल्ह्याच्या मानाने इराकला २०० रुपये अधिक म्हणजेच १ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे.
त्यामुळे केळी इराकला पाठविण्याचा निर्णय घेतला. वरूड येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर काळेवार यांनी दहा वर्षांपासून केळीची लागवड करणे सुरू केले आहे. परंतु केळी सातासमुद्रापार पाठविण्याची पहिलीच वेळ आहे.
दरवर्षी कापूस, तूर, सोयाबीन (Cotton tur Soybean) व इतर पिके घेऊनही काही फायदा होत नाही हे पाहून केळीची लागवड करणे सुरू केले. यातून तरी थोडाबहुत हातभार मिळेल आणि दोन पैसे मिळतील म्हणून केळीची लागवड करणे सुरू केले, असे शेतकऱ्याने सांगितले.
दोन एकरांवर केली केळीची लागवड
दोन वर्षांपासून अनेक संकटांचा सामना करत आलो आहे. यावर्षी दोन एकरामध्ये केळीची लागवड केली आहे. केळी लागवडीपासून केळीची काढणी करेपर्यंत जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. मध्यंतरी झालेल्या वादळामुळे केळीचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचेही शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
खताची मात्रा अधिक दिली; अन केळी बहरली
शेती करणे सध्या अवघड होऊन बसले आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून केळीची लागवड केली. केळीची वाढ होण्यासाठी व भरून येण्यासाठी युरिया, पोटॅश, डीएपी, कॅल्शियम, बोरॉन या खताची मात्रा दिली. त्यामुळे केळी भरून आली. इराक (Iraq) देशात केळी पोहोचली म्हणून त्याचेही समाधान मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनी फळ लागवडीकडे वळणे आवश्यक आहे. - दिगंबर काळेवार, शेतकरी.
हेही वाचा - Success Story आंब्याने दिली सुखाची दिशा; प्रगतीशील मिठ्ठू काकांची ही यशकथा