नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. अर्धापूर, मुदखेड, भोकर, हदगाव आदी तालुक्यात सर्वाधिक केळीचे पीक घेतल्या जाते. यामध्ये अर्धापुरी केळीला विदेशातदेखील मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी केळी लागवडीत दरवर्षी लाखो रुपयांचा नफा कमावत आहेत. त्यासोबतच आंबे, संत्रा, मोसंबी, पेरूदेखील जिल्ह्यात विक्रमी उत्पादन घेतले जाते.
फळलागवडीतून शेतकऱ्यांना मिळतेय चांगले उत्पन्न
■ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत फळशेतीची निवड केली. फळलागवडीतून पारंपरिक शेतीपेक्षा अधिकचे उत्पन्न मिळत आहे.
■ जिल्ह्यातील वातावरण हे फळशेतीसाठी पूरक आहे. त्यामुळे केळीसह मोसंबी, चिकू, आंबा, पेरू, फणस, पपई यासारखे फळशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. फळशेतीमुळे मजुरांनाही मोठ्या प्रमाणात काम मिळते. त्यामुळे रोजगाराची समस्यादेखील यातून कमी झाली आहे.
सर्वाधिक क्षेत्र केळीचे
अर्धापूर, मुदखेड, भोकर, नायगाव, उमरी आदी तालुक्यात सिंचन क्षेत्र चांगले आहे. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या भागातील शेतकरी केळीची लागवड करतात. त्यातून ते लाखो रुपयांचे उत्पादन घेतात.
विदेशातही निर्यात
अर्धापूरच्या केळीला विदेशातही मागणी आहे. दरवर्षी येथील केळी विदेशात निर्यात केली जाते. त्यातून लाखोंचा नफा शेतकऱ्यांना मिळत आहे. येथील केळी खायला चवदार असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
वर्षाकाठी मिळतोय २५ लाखांचा नफा
भोसी शिवारात माळरान जमिनीवरील शेतात दहा एकरवर आंबा, पेरू, जांभूळ, केळी, सीताफळाची लागवड केली. आज वर्षाकाठी फळविक्रीतून मला खर्चवजा जाता निव्वळ २५ लाखांचा नफा मिळत आहे. त्यासोबतच काही विदेशी पिकांचीही नव्याने लागवड केली आहे.- नंदकिशोर गायकवाड, फळ उत्पादक