Join us

बन्ने गुरूजींनी ५० गुंठ्यात केला १०० टन ऊस; कमावले तीन लाख

By बिभिषण बागल | Published: September 06, 2023 2:48 PM

५० गुंठ्यांत १०५टन कधी काळी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती झाली पन्नास गुंठ्यात तीन लाख, चार हजार पाचशे रुपयांची मिळकत झाली.

दादा माझं वय ७० माझा वाट्याला हा फक्त ५० गुंठ्याचा तुकडा आला आहे. मला आयुष्यात एकदातरी ह्या जमिनीच्या तुकड्यातून १०० टन उसाचे उत्पादन घ्यायचे आहे., हे शब्द होते नेज गावातील निवृत्त शिक्षक मल्लापा बन्ने यांचे. बन्ने दादांनी व्यक्त केलेल्या इच्छेची पूर्ती थोडी अवघड वाटत होती. कारण  वयोमानानुसार त्यांचे शरीर या १०० टन ऊसाच्या महत्वाकांक्षेला किती साथ देईल, याचे भलेमोठे प्रश्नचिन्ह माझ्या समोर होते. आपण या कामावर संपूर्ण जोर लावूया. मी माझा सगळा पुरेपूर अनुभव या क्षेत्रासाठी उतरवतो. जे काही करता येईल ते आपण करूया. मी उत्तरलो. सत्तरीतल्या बन्ने गुरुजींची जिद्द पाहून मन प्रफुल्लित झाले उत्साहित झाले.

बन्ने गुरुजींनी ऑगस्ट, २०२१ मध्ये को-८६०३२ या ऊस जातीची रोप लागण केली. ऊसाची लागण करताच आम्ही त्या क्षेत्रावर भेट दिली. काही रोपांकडे पाहून असा अंदाज आला की, ही रोपे कदाचित पुढे जाऊन गवताळ वाढ, या रोगास बळी पडतील आणि काही दिवसानंतर तसेच गवताळ वाढीचे गुणधर्म या रोपांवर दिसू लागले. आम्ही गुरुजींना तात्काळ अशी रोपं उपटून बाहेर टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या रोगाची वाढ झाली नाही. ज्यावेळेस मी या क्षेत्राची माहिती घेत होतो, त्यावेळी मी गुरुजींना प्रश्न विचारला होता की इथे हुमणीचा प्रादुर्भाव होतो का? त्यावर त्यांचे नकारात्मक उत्तर आले. पण आम्हाला असे जाणवत होते की कदाचित ह्यावेळी या क्षेत्रावर हुमणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि अंदाज खरा ठरला. भेट दिल्यानंतर काही दिवसातच गुरुजींनी मला संपर्क केला आणि हुमणी झाल्याच सांगितले. हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही त्यांना बिव्हेरिया, मेटारहायझम आणि व्हर्टिसिलियम या बुरशींचा वापर करण्यास सांगितले. फक्त दोन वेळेसच, या बुरशींचा वापर करताच हुमणी अळीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात यश आले.

आमचे काटेकोर नियोजनाचे प्रयत्न सुरूच होते. ऊसाकडे पाहून या ऊसाची वाढ जलदगतीने होईल असा अंदाज होता. ज्यावेळेस तो ऊस नुकताच फुटवा घेत होता त्यावेळी चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यासोबत हा ऊस एका महिन्यात आपल्या डोक्याएवढी उंची गाठेल असा आत्मविश्वासही व्यक्त केला होता. ऊसाचे कोंब त्यावेळेस नुकतेच फुटवे तयार करत होते. एका महिन्यात हा ऊस डोक्याएवढा उंच होईल ही बाब अविश्वसनीय होती. पण चिलेटेड सुक्ष्मअन्नद्रव्य, फोटोसिंथेटिक बॅक्टरीयांची ह्या दोघांची फवारणी सोबत नत्र स्थिर करणारे जिवाणू, स्फुरद उपलब्ध करणारे जिवाणू, पालाश उपलब्ध करणारे जिवाणू, सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जिवाणू ह्या सगळ्यांचा वापर करताच हा ऊस एका महिन्यात आमच्या डोक्याएवढी उंची गाठू शकला पूर्वी जेमतेम पाणी देणे आणि बारीकसारीक कामांसाठी शेताकडे येणारे गुरुजी आता त्यांना शेताची ओढ लागली. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत शेतामध्येच काम करत राहायचे. पीक जस जसे वाढू लागले तसतसे त्यांना काम करण्याचा उत्साह वाढला. घरातील मंडळी त्यांना काम करत असलेले पाहून चिंताग्रस्त झाली. परगावी वास्तव्यास असलेली त्यांची मुलं काही दिवस सुट्टीसाठी बोलवत असत. पण ह्या म्हाताऱ्या शरीरात आता तारुण्याचा संचार झाला होता.

या ऊसास २००:१००:१०० या प्रमाणात नत्र स्फुरद आणि पालाश वापरण्याचे नियोजन केले. पूर्ण  १४ महिन्यांच्या कालावधीत ८ पोती युरिया+१२ पोती सिंगल सुपर फॉस्फेट+४पोती म्युरेट ऑफ पोटॅश (पांढरे पोटॅश) टप्याटप्याने वापरण्यात आले.त्यावेळेस संपूर्ण खतांचा खर्च ₹ १४,५००/- इतका आला. काही प्रमाणात शेवटच्या टप्प्यात खते वापरता आली नाहीत. पण जिवाणूंच्या जोरावर ही कमतरता भरून निघाली. दिलेल्या सर्व अन्नद्रव्यांचे विघटन झाले आणि त्याचा प्रत्यय उसाचा पानांकडे पाहिल्यास जाणवत होता. नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूंचा वापरामुळे सुरुवातीपासून उसाची तोड येईपर्यंत कांड्यांची लांबी ६ इंचांपर्यंत मिळाली. सिंगल सुपर फॉस्फेटचे विघटन स्फुरद उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे पानांची लांबी मध्ये लक्षणीय वाढ जाणवली. त्यामुळे खोडाची म्हणजेच ऊसाची जाडी चांगली वाढली. पानांवर पालाश या अन्नद्रव्यांची कमतरता जाणवू नये, यासाठी पानांचे वारंवार निरीक्षण चालु होते. काही वेळेस म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करूनही उसाचा पानांवरील कमतरता भरून निघाली नाही. त्यावेळेस जमिनीमधून पाण्यावाटे पालाश उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंचा वापर करण्यात आला. काही दिवसात याही अन्नद्रव्यांची गरज पूर्ण झाली.

या सगळ्या नियोजनामध्ये गुरूजींनी सातत्य ठेवले. बऱ्याच अडचणी आल्या. डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा जाणवला. मजुरांची समस्या जाणवली. उंदरांनी आपले डोके वर काढले. अशा असंख्य अडचणींचा सामना करत ऊस शेवटी कारखान्याला गेला. हातात वजनाची पावती आली. खेपांची बेरीज केल्यावर आकडा आला ५० गुंठ्यांत १०५ टन. कधी काळी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती झाली. पन्नास गुंठ्यात तीन लाख चार हजार पाचशे रुपयांची मिळकत झाली. जास्तीचे रासायनिक खते, टॉनिक, संप्रेरके, ह्युमिक ऍसिड ह्या कोणत्याही घटकाच्या वापराची गरज भासली नाही. निव्वळ जिवाणू आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिइंट्सच्या मदतीने एवढा मोठा पल्ला गाठता आला. शेवटी एकच गोष्ट मनात सारखी सारखी भिरभिरते कोशिश करने वालों की कभी हार नही होती.

लेखन:विवेक पाटील (सांगली)शेतकरी:मल्लापा बनने (नेज, हातकणंगले)९८५०५४८१४९

टॅग्स :ऊसशेतकरीसांगलीखतेशिक्षक