Join us

रासायनिक भाज्यांना ठोकला रामराम, सेंद्रिय शेतीतून महिलांना गवसला आर्थिक उत्पन्नाचा मार्ग

By मुक्ता सरदेशमुख | Updated: December 21, 2023 14:30 IST

आता बाजारातून कशाला आणायचा भाजीपाला ?

रविंद्र शिऊरकर

जेमतेम शिक्षण घेतलेली एखादी बाई काय करू शकते? फार तर शेतीत नवऱ्याला मदत,अशी सामान्य समजूत बाजूला सारत छत्रपती संभाजीनगरमधील महिलांनासेंद्रिय शेती करत चांगलं जगण्याचा मार्ग गवसला आहे. बचत गटातून एकत्र येत वैजापूरमधील १० महिलांनी  रासायनिक भाजीपाल्याला रामराम ठोकला आहे.

देशभरात अन्नसुरक्षेवरून सुरू असणारा गदारोळ त्यांच्या कानावरही गेला नसावा कदाचित. पण रासायनिक खतांच्या भडीमाराने झटपट उत्पन्न न कमवता सेंद्रिय पद्धतीने, नैसर्गिक पिकवलेलं खाण्याचं महत्त्व तिला पक्क ठाऊक.  शिक्षण जेमतेम असलं तरी बचत गटाच्या माध्यमातून महिला एकत्र आल्या आणि आपापल्या घरी, शेतात सेंद्रिय भाजीपाल्याची लागवड केल्याने त्यांना घराला हातभार लावल्याचे समाधान मिळतेय.  छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातलं धोंदलगाव. या छोट्याशा गावात दहा महिला बचत गटातून एकत्र आल्या. परसबागेपासून सुरुवात करत हळूहळू आता सगळा भाजीपाला, फळे सेंद्रिय पद्धतीने पिकवत त्यातून उत्तम उत्पन्न त्या घेत आहेत.आता बाजारातील रासायनिक भाजीपाल्याला रामराम ठोकल्याचंही त्या सांगतात. नैसर्गिक पिकवलेलं, रासायनिक खतांचा वापर नसलेलं अन्न खायचं या एका उद्देशाने आधी स्वतःचे शेत सेंद्रिय करण्यास सुरुवात केली. वैजापूरच्या धोंदलगावात दहा महिलांनी एकत्रित येत जानकी देवी बजाज फाऊंडेशन मार्फत विविध प्रशिक्षणे घेत त्यातून सेंद्रिय अर्कांची आपापल्या घरी व शेतात निमिर्ती केली. त्याद्वारे सेंद्रिय भाजीपाला, फळ पिके पिकवली आहे. ज्यामुळे या घरांमध्ये आज बाजारातून भाजीपाला आणायची गरज भासत नाही.सोबत रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेले अन्न आपण खात नसल्याचे समाधान धनलक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांना आहे.लता बळीराम वाघ यांनी आपल्या घरी पूर्णपणे सेंद्रिय शेती केली असून त्याद्वारे ते उत्तमरीत्या उत्पन्न देखील घेत आहे. याचं सेंद्रिय चळवळीत आपल्या परिसरातील महिलांनीही यावे यासाठी धनलक्ष्मी गटाची ०६ ऑक्टोबर २०२० ला सुरुवात झाली. 

विविध सेंद्रिय अर्कांची निर्मिती 

धनलक्ष्मी गटाद्वारे सर्व महिला एकत्र येत दशपर्णी अर्क, निंबोनी अर्क, आदींची निर्मिती करतात. ज्याच्या वापर पुढील तीन ते सहा महिने सर्वांच्या घरी असलेल्या भाजीपाला परसबागेत व विविध फळांच्या झाडांवर केला जातो. या विविध अर्कांच्या वापराने किटकांचा नाश होतो मात्र हे अर्क मित्र किटकांना परिणामी नसल्याने त्याच्या परागिकरणासाठी फायदा होतो तसेच झाडांना विविध सुष्म अन्नद्रवांची पूर्तता यातून होते. 

गांडूळ खत, वर्मी वाश व दुध उत्पादन

या गटातील काही महिलांनी गाईंची खरेदी करून त्यांच्या शेणाद्वारे व वैराणीतील शिल्लक चाऱ्यापासून गांडूळ खत बनवतात. ते आपल्या शेतातही वापरतात. तसेच या गाईच्या दूध विक्रीतून त्यांच्या घराला आर्थिक हातभार देखील लागत असल्याचे शालिनी वाघ सांगतात. 

विविध फळे व भाजीपाला सर्वांच्या दारी

या गटाच्या सर्व महिलांच्या घरी आंबा, शेवगा, चिकू, नारळ, अंजीर, पेरू, आवळा, तर वेलवर्गीय मध्ये काकडी, कुहरी, तुरई, भोपळा, तसेच घरच्या गरजेपुरता कांदा, लसूण विविध पालेभाज्या, रानभाज्या आहे. तसेच गटातील काही महिलांच्या घरी गहू, आद्रक, असे पिके देखील पूर्णपणे सेंद्रिय आहेत. भविष्यात सर्वांच्या घरी पूर्णपणे सेंद्रिय शेती करणार असल्याचे गटातील महिला सांगतात. 

भविष्यातील गटाच्या योजना

या गटाद्वारे भविष्यात ड्रोन खरेदी करण्यात येणार असून ते परिसरात भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. तसेच सर्वांच्या घरी तेलबियांचे उत्पन्न घेण्यात येणार असून त्या तेलबियांपासून तेल काढण्यासाठी तेल घाणा देखील उभारणार असल्याचे या गटाच्या अध्यक्षा लता वाघ यांनी सांगितले. 

धनलक्ष्मी गटातील सहभागी महिला 

लता बळीराम वाघ (अध्यक्ष), शालिनी रामदास वाघ (सचिव), सदस्य - उषा सोपान वाघ, संगीता बद्री वाघ, संगीता वसंत पवार, उज्वला योगेश वाघ, मंदा निवृत्ती वाघ, सरिता गणेश वाघ, वैशाली अनिल वाघ, रुपाली आवारे. 

 

टॅग्स :सेंद्रिय शेतीसेंद्रिय भाज्यामहिला