मेहरून नाकाडे
रत्नागिरी तालुक्यातील फणसोप येथील अंगणवाडी सेविका असलेल्या भाग्यश्री मूरकर यांनी आपली शेतीची आवड जोपासली आहे. त्यांनी कुटुंबीयांसह बागायती लागवडीसह केरसुणी तयार करणे, गांडूळखत निर्मिती व्यवसाय सुरू केला आहे. भाग्यश्री मूरकर यांची वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. त्या जमिनीत सुरुवातीला भात लागवड करण्यात येत होती. त्यानंतर काजू लागवड करण्यात आली. मात्र, उत्पन्न कमी झाल्याने त्यांनी नवीन लागवडीचा निर्णय घेतला. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये मुंबईत असलेली त्यांची दोन्ही मुले गावाकडे आली होती. बंदमुळे कुटुंबातील सर्व सदस्य घरी असल्याने बागेची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला व साफसफाई करून नवीन लागवडही केली.
भाग्यश्री अंगणवाडी सेविका असल्या तरी फावल्या वेळेत माडाच्या झावळ्यांपासून केरसुण्या तयार करत असत. दीपश्री बचतगट व श्री लक्ष्मीकेशव उत्पादन गटाच्या माध्यमातून त्या सतत सक्रिय असल्याने अभिषेक साळवी यांनी केरसुणी तयार करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. त्यासाठी लागणाऱ्या झावळ्या उपलब्ध करून देण्यासाठी झाडू विकत घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे केरसुणी तयार करण्याच्या कामाला गती मिळाली. त्यांनी अन्य महिलांनाही केरसुणी बनविण्यासाठी तयार करून चार पैसे मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली. केरसुणीसाठी हीर काढल्यानंतर राहिलेल्या पाती फेकून देण्यापेक्षा त्याचे तयार खत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांना 'अनुलोम'चे रवींद्र भुवड यांचे मार्गदर्शन मिळाले.
स्वतःचे गांडूळ खत युनिट तयार करण्यापूर्वी कोतवडे येथील गांडूळ खत युनिट त्यांनी पाहिले. नंतर बेड तयार केला. गांडूळ खतासाठी लागणारे शेण मिळविण्यासाठी त्यांनी गाय विकत घेतली. हळूहळू तीन गायी व १३ म्हशी विकत घेतल्या. गांडूळ खतामुळे त्यांचा दुग्धोत्पादन व्यवसायही सुरू झाला. सुरूवातीला तयार केलेले गांडूळ खत त्यांनी बागायतीला वापरले. त्यामुळे त्यांच्या बागेतील आंबा, सुपारी, नारळ, कोकम, मसाला पिकांची लागवड चांगली बहरली आहे. एकाशी संलग्न एक व्यवसाय त्यांनी सुरू केले असून, त्यामध्ये त्यांचा आता जमही बसला आहे. मात्र, हे करत असताना अंगणवाडीकडे त्यांनी कुठेही दुर्लक्ष केलेले नाही. स्वतः काम करत असताना त्यांनी व्यवसायासाठी गावातील अन्य महिलांनाही प्रोत्साहित करून काम मिळवून दिल्याचे त्यांना विशेष समाधान आहे.
कोरोनामध्ये लागवड
कोरोना काळात मोठा मुलगा नीलेश, धाकटा मुलगा शैलेश यांनी बागेतील साफसफाई करून जमिनीचे सपाटीकरण केले. त्यानंतर बोअरवेल मारुन कंपाऊंड घातले, जमिनीत ५५० सुपारी, ४० नारळ, ५३ आंबा, ७० कोकम, २१ फणसांसह जायफळ कलमांची लागवड केली आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन सुविधा बसविली आहे. योग्य खत व पाणी व्यवस्थापनामुळे कलमांची चांगली वाढ झाली असून, तीन वर्षात नारळाला पोय येण्यास सुरुवात झाली आहे.
झावळा उपलब्ध केरसुणी खरेदी
केरसुणी तयार करण्याच्या भाग्यश्री यांच्या कौशल्याला अभिषेक साळवी यांनी प्रोत्साहित करत त्यांना झावळ्या उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर त्यांनी तयार केलेल्या केरसुण्या खरेदीही केल्या. त्यामुळे भाग्यश्री यांना केरसुणी तयार करण्याचे काम मिळाले. परंतु, साळवी मोठ्या प्रमाणावर झावळ्या उपलब्ध करून असल्याने गावातील अन्य महिलांनाही त्यांनी केरसुणी तयार करण्यासाठी तयार केले. त्यामुळे सध्या भाग्यश्री व त्यांच्या सहकारी मोठ्या प्रमाणावर झाडू तयार करत आहेत.
पाच टन खत निर्मिती
केरसुणीसाठी हीर काढल्यानंतर पाती फेकून देण्यापेक्षा त्यापासून गांडूळ खतनिर्मिती सुरू केली. दरवर्षी पाच टन खत तयार होत आहे. स्वतःच्या बागायतीसाठी खत ठेवून उर्वरित खतांची विक्री करतात. केरसुणी व्यवसायाबरोबरच गांडूळ खतनिर्मिती व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. गांडूळ खतासाठी त्यांनी गायी/म्हशी विकत घेतल्या. गोबरगॅस युनिटमुळे त्यांचा इंधनाचा खर्च वाचला आहे. गांडूळ खताला चांगली मागणी असल्याचे भाग्यश्री यांनी सांगितले.
कुटुंबीयांचे सहकार्य
लॉकडाऊन संपल्यानंतर दोन्ही मुले पुन्हा नोकरीसाठी मुंबईत गेली. परंतु, भाग्यश्री व त्यांचे पती दोघे गावात आहेत. भाग्यश्री अंगणवाडीचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करून केरसुणी, गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना 'आदर्श अंगणवाडी सेविका 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कारासह अन्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पती, दोन्ही मुले, सुना या सर्वांचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.