रविंद्र शिऊरकर
मराठवाड्यातील जमीन. पाणी कमी, त्यात दुष्काळी पट्टा. पारंपरिक पिकांचा भाव हवामानाच्या लहरीवर ठरणारा. काय वेगळे केले तर अधिक उत्पन्न मिळवता येईल हा शेतकऱ्यांचा कायमचा प्रश्न. मग अनेकजण वेगवेगळ्या प्रकारे माहिती मिळवत कुठलंसं नवं पीक घेतात. अन् यशस्वीही होतात. पारंपरिक पिकांना नव्या प्रयोगांची जोड देत भक्कम कमाई करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यादीत आता छत्रपती संभाजीनगरचा हा शेतकरीही जाऊन बसलाय.बाजारपेठेचा अभ्यास,शेतीचे योग्य व्यवस्थापन व काटेकोर नियोजनातून हा शेतकरी पारंपरिक शेतीला फुल शेतीची जोड देत उत्तम उत्पन्न मिळवतोय.
अवघे २००० लोकसंख्येचे भांडेगाव. सततचा दुष्काळ या भागाला नवा नाही. खुलताबाद तालुक्यातील वेगवेगळे पाणलोट प्रकल्प, जलव्यवस्थापनाच्या कामाने गेल्या काही वर्षांपासून या भागात काहीशी हिरवळ आता दिसू लागलीये खरी. या गावातील शेतकरी जनार्धन रावसाहेब चव्हाण यांची पारंपरिक शेती. ऊस, कपाशी, मका, आद्रक, खरीप कांदा घेणारे हे शेतकरी.
शेतात लावलेल्या अद्रक पिकावर रोग पडला. पिकाला निमॅटोड सूत्रकुमीचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावर उपाय शोधत असताना झेंडू लावल्यानंतर पिकावरच्या रोगाला आळा बसत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मग शेतात झेंडू लावला. झेंडूची फुलं शहराच्या जाधवमंडी, सिटीचौक परिसरातील फुल विक्रेत्यांना विकल्यानंतर चांगला भाव मिळाला. मग वारंवार बाजारातल्या खेपा वाढल्या. वेगवेगळ्या फुलांची माहिती मिळाली. कशाला मागणी आहे हे लक्षात आले. अन् सुरु झाली फुलशेतीला सुरुवात. आता झेंडू, शेवंती, बिजली अशा फुलांसह अवघ्या १० ते २० गुंठ्यात लागवड करत जनार्धन चव्हाण चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सध्या त्यांच्या शेतात ऊस, मका या पारंपरिक पिकांसह १० गुंठ्यावर बिजली फुलांची लागवड आहे.
बिजली फुलाने केली कमाल
बिजली हे फुल पीक ऑक्टोबर ते मार्च दरम्यान येणारे. जनार्धन यांनी १० गुंठे क्षेत्रात ४.६ फूट बाय १ फूट अंतरावर २००० रोपांची लागवड आहे. अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाने काही रोपे जळाली. मात्र, साधारण १८०० - १९०० रोपे सध्या चांगली फुलली आहेत.लागवडीनंतर पोटॅश, बेसल डोस, युरिया एकरी ५० किलो प्रमाणे या फुलांना खते देण्यात आली आहेत. ३ महिने टवटवीत राहणाऱ्या या बिजली फुलांवर बुरशी व पांढऱ्या माशीचा मुख्य प्रादुर्भाव असतो. त्यासाठी विविध बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या जातात.लागवड खर्च अन् उत्पन्नाचं गणित
रोपांची खरेदी ते विक्रीपर्यंत १० ते १५ हजार रुपयांचा खर्च (१० गुंठे क्षेत्राकरिता) आहे. सध्या सरासरी ७० ते ८० रुपये बाजारभाव बिजली फुलांना आहे. ९-१० क्विंटल अपेक्षित उत्पादन असून यातून जवळपास ७०००० पर्यंत उत्पन्न मिळण्याची चव्हाण यांना अपेक्षा आहे.