Lokmat Agro >लै भारी > केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध, जळगावच्या शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध, जळगावच्या शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

Biscuits made from bananas, Jalgaon farmer got a patent by central government | केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध, जळगावच्या शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध, जळगावच्या शेतकऱ्यांचा अनोखा प्रयोग

जळगावच्या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध लावला असून त्यांना पेटंट सुद्धा मिळाले आहे.

जळगावच्या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध लावला असून त्यांना पेटंट सुद्धा मिळाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Banana Biscuit : हल्ली शेती करणे मुश्किल झाले आहे, त्यामुळे अनेकजण शेतीत बदल करत नवी सांगड घालण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्याचबरोबर शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेती फुलवली जात आहे. जळगावच्याकेळी उत्पादक शेतकऱ्याने केळीवर प्रयोग करत आज केळीपासून तब्बल सहा उत्पादने तयार केली जात आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने केळीपासून बिस्किटे बनविण्याचा शोध लावला असून यासाठी त्यांना पेटंट सुद्धा मिळाले आहे. एकूणच या शेतकऱ्याने शेतीतूनच नवा मार्ग शोधत इतरांसाठी पर्याय उभा केला आहे. 

जळगाव जिल्हा कापूस आणि केळीसाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा म्हणून ओळख आहे. देशात सर्वाधिक केळी उत्पादन करणारा जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याकडे पाहिले जाते. केळी लागवड मोठ्या संख्येने होत असल्याने अनेकदा कवडीमोड भावातच केळी विक्री करावी लागत असल्याचे शेतकरी सांगतात. जळगाव जिल्ह्यातीलच यावल तालुक्यातील रहिवासी असलेले अशोक गाढे यांनी मात्र हार न मानता यावर उपाय केला. आणि आज हीच केळी वेगवगेळ्या स्वरूपात महाराष्ट्रभर विक्री केली जात आहे. टॉफी, पापड, लाडू आणि आता बिस्किटाच्या स्वरूपात केळी बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत. याच सर्व श्रेय अशोक गाढे आणि त्यांच्या कुटुंबियांना जात. गाढे यांनी ही उत्पादने केळीपासून तयार करण्याचा उद्योग सुरु करत इतरांच्या हाताला देखील काम दिले आहे. 

शेतीसाठी वकिली सोडली.. 

अशोक गाढे यांचं शिक्षण एलएलबी. एललबीची पदवी घेतल्यानंतर त्यांनी सुमारे पाच वर्षे कायद्याचा सराव केला. मात्र, 1990 मध्ये वडिलांचे निधन झाल्याने त्यांना सराव सोडावा लागला. यानंतर वडिलोपार्जित असलेली पाच एकर शेती करण्यास सुरवात केली. पिढ्यानपिढ्या आम्ही केळीची लागवड करत आलो. मात्र  जेव्हा जेव्हा केळीचा माल बाहेर यायचा, तेव्हा तेव्हा कवडीमोल भावात केळीची विक्री करावी लागत असे. “जेव्हाही केली विकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नेहमीच नुकसान सहन करावे लागले. केळीची शेती फायदेशीर का नाही असा प्रश्न अनेकदा पडला. अनेकदा केळी साठविण्याचा प्रयत्न केला, मात्र हे नाशवंत पीक असल्याने माल तयार झाल्यावर वाटेल त्या भावात केळीची विक्री केली.. कालांतराने आम्ही केळीवर काही प्रक्रिया उद्योग करता येईल का? असा विचार केला. त्यानुसार अनेक दिवस प्रक्रिया केली, संशोधन केलं. 

केळीच्या बिस्किटांचे पेटंट

शेवटी अशोक आणि त्यांची पत्नी कुसुम यांनी केळीच्या फळांवर प्रक्रिया करून उत्पादनाचे शेल्फ लाइफ वाढवण्याची कल्पना मांडली. आज, हे जोडपे केळीच्या चिप्स, जाम, कँडीज, पापड, चिवडा आणि लाडू यांसारखे केळीचे पदार्थ बनवतात. विशेष म्हणजे या जोडप्याने केळ्यांमधून बिस्किटांचाही नवीन शोध लावला आहे. आणि या वर्षी एप्रिलमध्ये केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या केळीच्या बिस्किटांचे पेटंट दिले आहे. त्यामुळे एकप्रकारे केळीपासून नाविन्यपूर्ण स्वरूपात बिस्किटे बनविण्याचा निर्णय आज अशोक गाढे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसह फायदेशीर ठरला आहे. विशेष म्हणजे 2010 पासून त्यांनी केळीवर प्रक्रिया करून इतर पदार्थ बनविण्यास सुरवात केली. मात्र त्यांना बिस्किटाचा शोध लागायला नऊ वर्ष जाऊ द्यावा लागली. 2019 मध्ये केळीपासून बिस्किटांचा शोध लागला. 

अशोक गाढे म्हणाले... 

अशोक गाढे म्हणतात की, सुरवातीला केळीच्या शेतीत जीवतोड मेहनत घेतली. मात्र हाती काहीच यायचं नाही. शिवाय ऑरगॅनिक केळी उत्पादन घेत असताना देखील त्यांना बाजारात भाव नाही, त्याच रेटने विकली जात आहे. त्यामुळे यातच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला अन् तो सफल झाला. आज पन्नासहून अधिक शेतकरी आमच्याशी जोडले असून त्यांच्याकडून बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करत असल्याचे गाढे म्हणाले. तसेच सदर प्रॉडक्ट ऑनलाईन तसेच काही फ्रँचाइजी द्वारे विक्री केली जातात. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढत असून सर्व ऑरगॅनिक असल्याने महाराष्ट्रभर हे प्रॉडक्ट विक्री होत असल्याचे गाढे यांनी सांगितले. 

Web Title: Biscuits made from bananas, Jalgaon farmer got a patent by central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.