- मुखरू बागडे
भंडारा : जिद्द व कर्तृत्व मनुष्याला ध्येयापर्यंत पोहोचविते. गावातच स्वतःलाही रोजगार शोधत मजुरांनाही रोजगार देण्याच्या मानसिकतेतून बागायत शेतीचे प्रयत्न फळाला आले. तई /बु येथील दोन भाऊ दोन एकर बागायतीत रमले. तीन महिन्यांत दीड एकर कारले पिकातून नगदी चार लाखांचे उत्पन्न हाती आले. गोपीचंद भेंडारकर व नाना भेंडारकर तई (बु.) यांनी शेतकऱ्यांना नवी आशा देत बागायती शेतीला सन्मान दिला आहे.
गोपीचंद भेंडारकर आणि कुटूंबियांची वडिलोपार्जित जवळपास २० एकर शेती आहे. परंतु, संपूर्ण शेती सिंचनाखाली नसल्याने वर्षातून एकदाच खरीप हंगामाची धानाची शेती पारंपरिकतेने करायचे. वाढत्या परिवाराचा खर्च भागविणे कठीण जात होते. चुलबंद नदीचा आधार असला तरी सिंचनाची सुविधा अपुरी होती. त्यामुळे दोन एकर जागेत स्वतंत्र सिंचन योजना तयार केली. दिवाळीनंतर कारले पिकाची लागवड दीड एकरात, तर अर्धा एकर जागेत वांगे, सांबार, टोमॅटो लावले.
कडू कारले गोड ठरले...
कारल्याच्या बागेला कृषी खात्याच्या मार्गदर्शनात तंतोतंत शास्त्रशुद्ध नियोजन केले. त्यामुळे लागवडीनंतर ४८ दिवसांत पहिला तोडा हातात आला. पहिल्याच तोड्याला ६०-७० ₹ किलोचा दर मिळाला. गत फेब्रुवारी महिन्यात मालाची आवक अर्थात उत्पन्न वाढत गेले व त्याच वेगाने दरसुद्धा वाढले. त्यामुळे कारले पिकाने दोन्ही भावंडांना कडू कारले गोड ठरले. शेतकरी गोपीचंद भेंडारकर म्हणाले की, प्राथमिक क्षेत्रातील कोणताही व्यवसाय सहसा तोटा देत नाही. बागायती शेती निश्चितच फायद्याची आहे. बाजारपेठेचा अभ्यास व कृषी विभागाचा सल्ला शेतकरी बांधवांनी तंतोतंत राबविला तर बागायात शेती शेतकऱ्याला आधार देणारी ठरते.
एक तोडा तीनशे ते पाचशे किलोपर्यंत...
कारले पीक उष्ण थंड वातावरणात चांगलेच बहरले. हप्त्यातून दोन तोडे तोडले गेले. एका तोड्यात ३००-४०० किलो कारल्याचे उत्पन्न मिळाले. दरसुद्धा ४० रुपये ते ७० रुपयांपर्यंतचा मिळाल्याने उत्पन्नात भरीव वाढ झाली. उत्पन्न घेण्याकरिता खर्च ठरलेला आहे. मजूर, दळणवळण, खते, कीटकनाशक व विक्री खर्च असा एकंदरीत अर्धा खर्च, तर अर्धा नफा उरत कारल्याच्या एका हंगामात दीड एकरात ४ लाखांचे उत्पन्न झाले. यातील शुद्ध नफा दोन लाखांचा चार महिन्यांत उरला.