सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्टा येथील माजी उपनगराध्यक्ष धैर्यशील झुंजारराव शिंदे यांनी राजकारण, समाजकारण करीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केळी विदेशात निर्यात करत आहेत. एकरी ३५ ते ४० टन विक्रमी उत्पादन घेतले आहे.
या केळीला टनाला २५ हजार रुपये दर मिळाला. त्यांनी युवकांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. धैर्यशील शिंदे यांची आष्टा ते इस्लामपूर रस्त्यावर सुमारे २४ एकर बागायत शेती आहे. त्यापैकी २० एकर क्षेत्रांत उसाची लागवड केली आहे. उर्वरित क्षेत्रात सहा महिन्यांच्या टप्प्याने केळीची लागवड केली आहे.
शिंदे यांनी नोव्हेंबरमध्ये बेळगाव येथून 'जी नाईन' केळीची रोपे आणून सहा बाय पाच फुटांवरती लागवड केली. या केळीला ठिबकने खत व पाणी देण्यासाठी विहिरीवरती ऑटोमायजेशन सिस्टीम बसवली आहे.
त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या यंत्राचा वापर करून हवामान जमिनीच्या गुणधर्माशी सुसंगत रासायनिक खते, पाण्याची असणारी गरज, कीड, रोग प्रादुर्भावाची सूचना याचा उपयोग करून उत्पादनात वाढ केली आहे.
तसेच जीवामृत तयार करून ते ठिबकद्वारे शेतीला देत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानासाठी कृषिरत्न संजीव माने आणि केळी पिकासाठी प्रशांत शिंदे, विराज पवार, अमोल शिंदे, संजय माळी यांचे मार्गदर्शन मिळाले.
या देशांना केळीची निर्यात
शिंदे यांनी लावलेल्या दोन एकर केळी इराण, ओमान, दुबई येथे पाठविली आहेत. बांधावरच उत्तम भाव मिळत आहे. तसेच आष्टा व परिसरातील बाजारातही नवरात्रीमुळे चांगला भाव मिळत आहे, असे धैर्यशील शिंदे यांनी सांगितले.
आष्टा शहरात प्रथमच ऊस व केळीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स या यंत्राचा वापर केला आहे. यामुळे जमिनीच्या गुणधर्माशी सुसंगत माहिती मिळाल्याने पिकाच्या उत्पादनात वाढ करता आली. - धैर्यशील शिंदे, प्रगतशील शेतकरी