मराठवाड्यातील दुष्काळी असलेल्या परांडा तालुक्यातील भांडगावने गाजराचं गाव म्हणून ओळख मिळवली आहे. देशी वाण आणि सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या या गाजराने चांगलंच नावलौकिक मिळवलं आहे. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील चार ते पाच तालुक्यांमध्ये या गाजरांची चव पोहचली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील परांडा हा मुळात कमी पाण्याचा आणि दुष्काळी तालुका. सिना कोळेगाव आणि खासापुरी धरणामुळे या परिसरातील शेतीला काही प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. पण याच तालुक्यातील भांडगावला मागील चार पिढ्यापासून सुरू असलेल्या गाजर शेतीमुळे नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे भांडगाव हे गावरान गाजराचं गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.
भांडगावमध्ये दरवर्षी सरासरी ५० एकरवर गावरान गाजराची लागवड केली जाते. विशेष म्हणजे या गावातील शेतकरी गावरान वाणाचे गाजर पूर्णपणे पारंपारिक पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने पिकवतात. यामुळे या गाजराची चव गोड आणि बाजारात चांगली मागणी असते. शेजारील गावात गाजर लागवडीचे प्रयोग करण्यात आले पण तेथील गाजर पांढरे उमटू लागले. भांडगावची माती गाजरासाठी पोषक असल्यामुळे या गाजरामध्ये चव आणि गोडी जास्त आहे. गाजरामध्ये 'अ' जीवनसत्व असल्यामळे डोळ्यासाठी लाभदायी ठरते.
सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये गाजराच्या बियाणाची पेरणी केली जाते. एका एकरामध्ये साधारण २५ ते ३० किलो बियाणे लागते. बियाणे हे घरीच तयार केले जाते आणि पावसाच्या पाण्यावरच हे पीक घेतले जाते. यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधांची फवारणी केली जात नाही किंवा रासायनिक खतेही टाकले जात नाहीत. त्यामुळे गावरान गाजराला विशिष्ट प्रकारची चव (गोडी) येते. लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यात म्हणजे दिवाळी नंतर नोव्हेंबर अखेर हे पिक काढणीसाठी येते.
विक्री
सध्या गाजराची विक्री ही, स्थानिक आठवडी बाजारात किंवा आडत, व्यापारी यांच्याकडून केली जाते. कृषी उत्पन्न समिती बार्शी, परांडा, वाशी, धाराशिव आणि सोलापूर जिल्हामध्ये या गाजराची विक्री होते. धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात भांडगावची गाजरे फेमस आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांना गाजरांच्या लागवडीसाठी कोणताही खर्च येत नाही. केवळ काढणीसाठी खर्च येतो. बाजारात एका किलोसाठी २५ ते ३० रूपयांचा दर मिळतो. एका एकरामध्ये साधारण १० ते १२ टन उत्पन्न मिळते. खर्च वजा जाता गाजराच्या पिकातून शेतकऱ्यांना तीन ते साडेतीन महिन्यामध्ये दीड ते पावणेदोन लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे गाजर हे पीक शेतकऱ्यांना परवडत असून दर चांगला मिळाला तर उत्पन्नात वाढ होणार आहे.
भांडगाव येथील जमीन गाजरासाठी पोषक असल्यामुळे याच गावात गाजराची शेती मागच्या तीन-चार पिढ्यांपासून केली जाते. शेजारच्या गावातील लोकांनी गाजर लागवडीचा प्रयत्न केला पण तेथील गाजरे पांढरे उमटतात. पण भांडगावच्या गाजरांना चव व गोडी जास्त आहे. आमच्या गाजरांना जीआय मानांकन मिळणे गरजेचे आहे.
- पृथ्वीराज ताकमोगे (शेतकरी, भांडगाव ता. परांडा, धाराशिव)