Join us

पहिल्या वर्षी खर्च पण दुसऱ्या वर्षी फायदा शेतकरी बिरा यांच्या साडेपाच एकरावरील ड्रॅगन फ्रुटची किमया

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 9:17 AM

Dragon Fruit Farming Success Story मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील शेतकरी बिरा चौंडे यांनी माळरानावर कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या ड्रॅगन फ्रूट या फळाची शेती फुलवली आहे.

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील खडकी येथील शेतकरी बिरा चौंडे यांनी माळरानावर कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या ड्रॅगन फ्रूट या फळाची शेती फुलवली आहे.

खडक, माळरानावर गवताशिवाय काही उगवत नाही, अशा कायमस्वरूपी दुष्काळी भागामध्ये कमी पाण्यावर येणाऱ्या ड्रॅगन फ्रुट या फळबागेतून भरघोस उत्पन्न घेत शेतीला पाणी नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.

बिरा चौंडे यांनी साडेपाच एकरमध्ये जम्बो रेड ड्रॅगन फ्रुट या व्हरायटीची निवड करून जेसीबीच्या साह्याने शेतीच्या जागेवर मातीची चाळण करत एकरी ७५० पोल प्लेट उभे केले.

या बागेमधील ओळीतील अंतर १० बाय ७ चे ठेवून एकूण ३५०० पोल व प्लेट असून, याठिकाणी १४ हजार रोपांची लागवड सप्टेंबर २०२२ मध्ये केली आहे.

या ड्रॅगन फ्रूट बागेला पहिल्याच वर्षी फळधारणा न करता रोपांची वाढ होण्यासाठी विशेष करून लक्ष केंद्रित केले. त्यामुळे दोन वर्षांचे ड्रॅगन फ्रुटचे झाड झाल्यानंतर आज त्यांना २०२४ मध्ये एकूण १९ टन उत्पादन या बागेतृ मिळाले आहे.

जागेवर दर... २२ लाखांचे उत्पन्नसध्या प्रति किलो ८० ते १०५ रुपये किलो दर जागेवर मिळत असून, २२ लाख रुपये आतापर्यंत उत्पन्न मिळाले आहे. बाजारपेठेत न जाता बागेमध्येच कोल्हापूर येथील व्यापारी जागेवर खरेदी करून ड्रॅगन फ्रुट घेऊन जात आहेत. अजून फळे येत असून, यातून ऑक्टोबर अखेरपर्यंत सहा लाख टन उत्पादन मिळणार आहे.

पहिल्या वर्षी खर्च... दुसऱ्या वर्षी फायदालागवडीचा खर्च प्रति एकर साडेचार ते साडेपाच लाख रुपयांपर्यंत झाला होता. मात्र, दुसऱ्याच वर्षी या फळाच्या पिकांमधून खर्च निघणार असल्याने या ड्रॅगन फ्रूट फळाच्या पिकामध्ये फायदा मिळणार असल्याचे प्रगतशील शेतकरी चौंडे यांनी सांगितले. पुन्हा फक्त नियोजन आणि पाणी याची काळजी घेणे गरजेचे आहे.

पाणी अडवून प्रथम पाण्याचे नियोजन करणे व ते पाणी शेतीमध्ये शेततळे करून साठवण करणे गरजेचे आहे. पूर्णपणे शेतीला वेळ दिल्यास फायदेशीर ठरणार आहे. या फळबाग पिकाला आठवड्यातून एक दिवस तीन तास पाणी दिले जाते. बाजारपेठेमध्येही ड्रॅगन फळाची मागणी चांगली आहे. - बिरा चौंडे, शेतकरी

टॅग्स :शेतीफलोत्पादनफळेपीकलागवड, मशागतपीक व्यवस्थापनशेतकरी