Join us

Success Story शेडनेट, पॉलिहाऊसमधून काकडी, शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 9:24 AM

सरकारी योजनांच्या आधारे आधुनिक शेती

बापू सोळुंके

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून अनुदानावर दोन शेततळी, शेडनेट आणि पॉलिहाऊस घेतले. या शेततळ्यांत पाणी भरून ठेवल्याने बाराही महिने शेती बागायती बनली. शेडनेट आणि पॉलिहाऊसमध्ये काकडी, रंगीत शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न घेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पिंपळगाव देव येथील चार भावांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

पिंपळगाव देव येथील दिनेश नागोराव लगड यांना गणेश, रमेश आणि विशाल हे तीन भाऊ. लगड परिवाराकडे १८ एकर शेती आहे. सन २०१८-१९ या वर्षी लगड कुटुंबाने पोक्रा योजनेतून एक एकरावर शेततळे घेतले. याच योजनेतून दुसऱ्या वर्षी त्यांनी एक एकरवर शेडनेट उभारले. शासनाकडून अनुदानही मिळाले. जमिनीसाठी पाणी कमी पडू नये, याकरिता त्यांनी २० गुंठे क्षेत्रात दुसरे शेततळे उभारले.

शेडनेटमध्ये उत्पन्न घेत असताना कलर शिमला मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी पॉलिहाऊसची गरज असल्याचे त्यांना समजले. यानंतर कृषी विभागाकडून पोखरा योजनेतून २० गुंठ्यांत पॉलिहाऊस उभारले. लगड परिवाराने एक एकरावरील शेडनेटमध्ये यावर्षी काकडीची लागवड केली होती.

यातून त्यांना यावर्षी सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पॉलिहाऊसमध्ये रंगीत शिमला मिरची लावली होती. वर्षभर शिमला मिरचीचे उत्पन्न मिळाले. शिमला मिरचीने लगड परिवाराला सात लाखांचे उत्पन्न दिल्याचे दिनेश यांनी सांगितले. यासोबतच दीड एकरावरील अद्रकाने चांगली साथ दिल्याचे ते म्हणाले.

दीड एकरामध्ये सुमारे ३०० क्विंटल अद्रकाचे उत्पादन मिळाले. प्रतिक्विंटल सात हजार रुपये दर मिळाल्याने अद्रकामधून सुमारे २१ लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

दुग्ध उत्पादनातही आघाडीवर

शेडनेट आणि पॉलिहाऊसमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नावरच विसंबून न राहता लगड कुटुंबाने दुग्ध उत्पादनावरही लक्ष केंद्रित केले आहे. आज त्यांच्याकडे आठ गायी आहेत. या गायींचे दररोज सुमारे १०० लिटर दूध डेअरीवर पाठविले जाते.

यातूनही चांगले उत्पन्न व शेतीला आवश्यक खतही मिळते. त्यांनी तीन एकर कापसाची लागवड केली होती. यंदा भाव न मिळाल्यामुळे कापूस अजूनही घरातच पडून असल्याचे ते म्हणाले. सोबतच शेतात उसाचेही पीक असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय कृषी सहसंचालक यांची भेट

विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम मोटे यांनी नुकतीच लगड परिवाराच्या शेतीला भेट दिली. शेडनेट आणि पॉलिहाऊसमधील शेतीबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

शिवाय लहरीनिसर्गावर अवलंबून न राहता शेततळे उभारल्याने तसेच शेडनेटमुळे आधुनिकतेची कास धरल्याने लगड कुटुंब शेतकऱ्यांसाठी आदर्श असल्याचे मोटे यांनी 'लोकमत'ला सांगितले.

हेही वाचा - स्पर्धा परीक्षा सोडून माळरानात फुलविली फळबाग; मराठवाड्यात परदेशी फळांचा थाट

टॅग्स :शेतीशेतकरीमराठवाडापीकमिरचीदूधशेती क्षेत्र