Join us

शेडनेटचा वापर करत अर्ध्या एकरात लावली काकडी, शेतकऱ्याला ३.५ लाखाचा नफा 

By मुक्ता सरदेशमुख | Published: July 31, 2023 9:13 PM

'पाऊसच नाही ओ!' 'उत्पन्नचं नाही यंदा',  'कधी उन्हामुळं पीके करपली' अशी कितीकारी उदाहरणं आजूबाजूला असताना प्रतिकूल हवामानात शेती टिकवणं ...

'पाऊसच नाही ओ!' 'उत्पन्नचं नाही यंदा',  'कधी उन्हामुळं पीके करपली' अशी कितीकारी उदाहरणं आजूबाजूला असताना प्रतिकूल हवामानात शेती टिकवणं शेतकऱ्याचं मोठं कसब. औरंगाबाद जिल्ह्यातील लाडसावंगी गावातील बंडू पाटील पडूळ यांनी शेडनेटमध्ये अर्ध्या एकरात काकडी लावली. केवळ सहा महिन्यात त्यांना ३.५ लाखाचा नफा झाला. याशिवाय दुसऱ्या अर्ध्या एकरात लावलेल्या शिमला मिरचीतुन त्यांना २ लाख ५५ हजार नफा मिळाला. 

"फळबाग शेतीतून मिळणारे उत्पन्न अधिक असून शेडनेटच्या तंत्रज्ञानामुळे फायदा झाल्याचे बंडू पाटील पडूळ  सांगतात. २० -२० गुंठ्याच्या शेडनेट मध्ये अर्ध्या एकरात काकडी आणि दुसऱ्या अर्ध्या एकरात शिमला लागवड केली. सहा महिन्यात काकडीला चांगला भाव मिळाला. शेडनेट मुळे तापमान नियंत्रणात राहते. पिकावर चमक येते. पण यासाठी पिकांची काळजीही तितकीच घ्यावी लागते.  यंदा २६ टन काकडी  २२ रुपये किलो या दराने विकली. आता एका दिवसाआड ६० बाय  ५५ च्या काकड्या येत आहेत. त्याला भाव पण चांगला मिळत आहे." 

शेडनेट शिवाय बंडू पाटील पडूळ  यांची १७ एकर फळबाग शेती आहे. डाळिंब, मोसंबी, टरबूज अशा फळांची लागवड यात केली आहे. विशेष म्हणजे या पिकांसाठी लागणारी अन्नद्रव्ये आणि खते ते स्वत: तयार करतात. जिवाणू शोधून खते बनवण्यापासून ड्रीप, निर्जंतुकीकरण, गोगलगाय, बुरशीनाशके, शेणखते  अशी सगळी काळजी ते घेतात. ही सगळी काळजी घेतल्यानंतर पिके कळीदार येतात,असेही ते म्हणाले.

"शेतीनंच सारं काही दिलं बघा."  शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशांमधून यंदा २ भाच्यांची लग्न लावल्याचे ते सांगतात. बारावीपर्यंत जेमतेम शिक्षण. छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. नंतर शेवटी शेतीकडे वळलो. २००५ पासून मी शेती करतो.  हळू हळू उत्पन्न वाढत गेलं. पैसा येत गेला.  मग २००९ ला ट्रॅक्टर घेतला. २०१० ते २०२३ पर्यंत फळबाग शेतीतून मी २.५  कोटी रुपयांची उलाढाल केली. २०१६ साली डाळींबाचे २९ लाख रुपयांचे  विक्रमी उपन्न  मिळाले . यावर्षी शेडनेट घेतले आहे. शेडनेटमुळे फरक पडतो. काकडी, शिमला असा दोन्ही पिकांना चांगला भाव मिळतोय."- बंडू पाटील पडूळ  

पारंपारिकपणे सूर्यप्रकाश आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या शेड नेट्स, अनेक दशकांपासून आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या आगमनाने त्यांच्या कार्यक्षमतेत बदल केला आहे, ज्यामुळे ते अधिक कार्यक्षम आणि विविध शेती परिस्थितीशी जुळवून घेण्यासारखे आहेत.

शेड नेट वापरात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने शेतकऱ्यांच्या खर्चातही लक्षणीय बचत झाली आहे. जाळ्यांखालील परिस्थितीचे दूरस्थपणे निरीक्षण आणि नियंत्रण करण्याच्या क्षमतेसह, शेतकरी पाणी, खते आणि कीटकनाशके वापरण्याचे प्रमाण कमी करू शकतात. यामुळे केवळ उत्पादन खर्च कमी होत नाही तर शेतीचा पर्यावरणीय परिणामही कमी होतो. आज, ते केवळ सावली देण्यासाठी साधनं राहिलेली नाहीत तर ती शेतीचा अविभाज्य भाग बनत आहेत, ज्यामुळे पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास बंडू पाटील पडूळ यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना हातभार लागला आहे.

टॅग्स :शेतकरीपीकपीक व्यवस्थापनतंत्रज्ञानशेतीशेती क्षेत्र