रविंद्र शिऊरकर
लागवडीपासून फवारणीपर्यंत ते ऊसतोडणीपासून विक्रीपर्यंत येणाऱ्या खर्चाची आणि मिळकतीची दरी कमालीची मोठी. इतर पिकांपेक्षा ऊसातून चार पैसे अधिक गाठीशी येतात खरे. कमी पावसात, मर्यादित पाण्यातही त्यामुळेच तर ऊसासारखे पारंपरिक पीक वर्षानूवर्षे घेण्याचा मोह शेतकऱ्याला न सूटणारा. मात्र, शेतीत नवीन प्रयोग करत अहमदनगर जिल्ह्यातील चांदेकसारे-सोनेवाडी गावातल्या गौरव कोऱ्हाळकर या शेतकऱ्याने दोन एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आता वर्षाकाठी या प्रगतशील शेतकऱ्याची कमाई ऐकाल तर तुम्हालाही नवल वाटेल!
बी एस्सी अग्रीचे शिक्षण घेऊन शेतीत नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या गौरव यांच्या घरची १४ एकर पारंपरिक ऊसाची शेती आहे. या शेतीत बदल करण्याचा विचार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे गौरव सांगतात. जगभरात शेतीचे नवे बदल घडत असताना आपल्या शेतातही नवं पीक घ्यावे या विचाराने दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर २०२१ मध्ये २ एकर क्षेत्रात त्यांनी संपूर्ण लाल असलेल्या जम्बो रेड जातीच्या ड्रॅगन फ्रुट ची १०×२ फूट अंतरावर डेंस सिंगल बार पद्धतीने लागवड केली.
कूजलेलं शेणखत आणि पाणी याव्यतिरिक्त कोणतंही रासायनीक खत न वापरता ड्रॅगन फ्रूटची रोपं चांगली जगली.डिसेंबर महिन्यात होणारी शाखीय वाढ व एप्रिल मे मध्ये फळधारणाही चांगली झाली.
वर्षांतुन एक दोनदा एम ४५ सारख्या सर्वसाधारण बुरशीनाशकाच्या एक दोन फवारण्या ते घेतात. या व्यतिरिक्त मात्र कुठलेही औषध खते ते या पिकाला वापरात नसल्याचे गौरव यांनी सांगितले.
विक्री व उत्पन्न
गौरव यांच्या २ एकर क्षेत्रात सध्या ७००० ड्रॅगन फ्रुटची रोपे असून झाडांना १४ महिण्यात फळ सुरु होतात. मात्र, फळांची संख्या कमी असल्याने पुढील दुसऱ्या वर्षांपासून उत्पन्न हाती येते. एकरी ३ ते ४ टन ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन सध्या गौरव याना मिळत आहे. गेल्या नोव्हेंबर मध्ये त्यांनी स्वतःहा बाजारात जाऊन विकलेल्या ड्रॅगन फ्रूटीला आकार व स्थिती नुसार १०० ते १६० असा दर मिळाला.नाशिक व वाशी येथील बाजारात चांगला दर मिळाला. आता वर्षाकाठी वर्षाकाठी या पीकातून सरासरी एकरी ४ ते ५ लाख रुपये मिळतात.
गुंतवणुक केल्यास यश हमखास
गौरव सांगतात, एकरी ३ ते ५ लाख ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्यासाठी खर्च येतो. यात रोपे, शेत तयार करणे, शेणखत, मजुरी, सिमेंटचे पोल, आडवे बार, व इतर बाबींचा समावेश आहे. मात्र, ही गुंतवणूक केल्यास वेळेत देखभाल केली तर ड्रॅगन फ्रुटमधून हमखास उत्पन्न घेणे शक्य आहे.
या पिकाची लागवड १० फूट अंतरावर असल्याने आत मध्ये कांदे, लसूण, व इतर पिके घेता येतात. तसेच ड्रॅगन फ्रुट निवडुंग वर्गीय (कॅक्ट्स) पीक असल्याने काही ठराविक तणनाशकांनाचा यावर काहीचं परिणाम होत नाही. ज्यामुळे तणनियंत्रण वेळीच करण्यात मदत होते. या फळाला सामान्यांमध्येही आता मागणी असल्याने तसेच दर चांगला असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पीक फायद्याचे आहे.
ऊसाच्या तुलनेत उत्पन्न वाढ
बागायत समृद्ध शेती असलेल्या या परिसरातील मुख्य पीक म्हणजे ऊस. या पारंपरिक पिकाला मेहनत, खर्च, मजुरी, आणि काढणीसाठी पुन्हा कारखानाच्या वायद्यांवर थांबणे या कचाट्यातून बाहेर जाऊन काही करता येईल का, या विचाराने केलेली ड्रॅगन फ्रुट शेती ऊसाच्या तुलनेत फाद्यायचीचं ठरल्याचे गौरव कोऱ्हाळाकर सांगतात.