स्वप्नीलकुमार पैलवान
कारले लागवडीनंतर ५० दिवसानंतर फळ तोडणीस तयार होतात. मात्र थंडीच्या दिवसात फळांची वाढ उशिराने होत असल्याने ६० ते ६५ दिवसानंतर फळ तोडणीस येतात. अपेक्षित दर मिळविण्यासाठी उत्पादनाचा दर्जा चांगला राखणे अत्यंत आवश्यक असते. त्यानुसार गुणवत्तापूर्ण उत्पादनाला बाजारपेठेत चांगला दर मिळण्यास मदत होते.
भोलावडे (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी सुर्यकांत बाबुराव काळे यांनी एसआरटी या अत्याधुनिक पद्धतीने तीस गुंठ्यामध्ये कारले पीक घेतले. खर्च वजा जाता हजारो रुपांचा फायदा मिळवला आहे. भोलावडे येथील शेतकरी सूर्यकांत काळे यांनी आपल्या पडीक शेतात आधुनिक पद्धतीने कारल्याचे पीक घेतले. त्यांनी कामथडीमधून तीन हजार आठशे रोपे आणली. रोपांची लागवड करण्यापूर्वी गांडुळ खतांचा डोस दिला.
तयार गादी वाफ्यावर दोन ओळीत ५ फुट व दोन वेलीत २ फुट अंतर ठेवून आक्टोबर मधील दूसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात दोन टप्प्यांत लागवड केली. दररोज दोन तास ठिबकने पाणी दिले. रोपे लावल्यानंतर दर चार दिवसांनी गोकृपा अमृत, देशी गाईचे गोमुत्राची फवारणी केली. बेणणी केली, आठ दिवसांनी दशपर्णी अर्काची फवारणी केल्याने कीड नियंत्रणात आली. दर चार दिवसांनी ठिबकद्वारे दोन किलो प्रमाणे संपूर्णा, मॅग्नेशियम सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट, बोराॅन, इसाबेन देत आहे.
अधिक वाचा: वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल; सहापट उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीने केली धमाल
तारकाठीने दोन आठवड्यानंतर कारल्याचे वेल बांधण्यास सुरुवात केली. जसे वेल वाढीला लागल्यावर दररोज वेल बांधणे सुरू केले. ४५ दिवसांनंतर चार दिवसांत एकदा कारल्याचा तोडा सुरू करण्यात आला. कारले अत्यंत कडू असले तरी त्यातील कर्बोदके, प्रथिने, खनिजे, अ आणि क जीवनसत्त्व यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवर्जून कारल्याची भाजी खाल्ली जाते. कारले रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते. लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते. नैसर्गिकरीत्या रक्त शुद्ध करते.
तारकाठीच्या मंडपाने फळांच्या उत्पादनात वाढ
कारली हे वेलवर्गीय पीक असल्याने जमिनीवरच वेल पसरल्यास मर्यादित फुटवे येतात त्यांचा परिणाम फळ उत्पादनावर होतो. या साठी वेलींना आधार दिल्याने वाढ चांगली होवून नवीन फुटवे येवून फळधारणा चांगली होत आहे. तारकाठीच्या मंडपाने फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर वाढत असल्याने वेल पाने, फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ती सडत नाहीत, कीड व रोगांचे प्रमाण कमी झाले. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहण्यास मदत झाली.
फळांचा रंग चमकदार गडद हिरवा व टोकाकडे फिकट असून आकार आणि आवरणाचा खरबडीतपणा, बिया मऊ आणि पांढऱ्या असल्याने कारल्याला मागणी जास्त आहे. सासवड शेवाळवाडी येथील मार्केटमध्ये घाऊक विक्री केली जाते. कारल्याच्या उच्च प्रतीमुळे दर चांगला मिळतो. आतापर्यंत १२ तोडे झाले असून दर तोड्यास सरासरी १२० किलो फळे मिळत आहेत. जानेवारी महिन्यांपर्यंत ७ तोडे होण्याची अपेक्षा आहे. - सूर्यकांत काळे, प्रगतशील शेतकरी भोलावडे