पारंपरिक शेतीतून आर्थिक उन्नती न होता केवळ तुटपुंजे पैसे हाती येतात. त्यालाही मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करावे लागतात; पण आधुनिक शेतीच्या माध्यमातून शेतीकडे पाहिले तर आता वाळवंटी प्रदेशातील ड्रॅगन फ्रूट याची लागवड करत अनेकांनी आर्थिक उन्नती हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्यात आली आहे.
आष्टी तालुका दुष्काळी असून तालुक्यात शेतकरी पारंपरिक शेती करतात. परंतु पारंपरिक शेतीतून हाती काहीच उरत नसल्यामुळे अनेक शेतकरी कमी पाण्यावर जास्त उत्पन्न देणाऱ्या फळबाग शेतीकडे वळले आहेत. यात बऱ्यापैकी आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने अनेकांनी प्रयोग म्हणून सफरचंद शेती केली. त्याचबरोबर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी वाळवंट प्रदेशातील ड्रॅगन फ्रुट चा सहा वर्षांपूर्वी प्रयोग केला. त्याला हवामान चांगले राहत असल्याने फळ देखील चांगले येत आहेत. आता तालुक्यातील बारा शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट शेती केली आहे. चोभा निमगाव, केळसांगवी, पिंपरी घाटा, म्हसोबावाडी, धनगरवाडी अशा गावांमध्ये योग्य नियोजन, वेळेवर खते आणि दोन ते तीन वर्षात फळ येत असल्याने आठ हेक्टर क्षेत्रावर सध्या ड्रॅगन फ्रुट शेतीची लागवड करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची आर्थिक उन्नती साधली आहे.
"पारंपरिक शेती न करता आता आधुनिक शेती करताना सफरचंद ड्रॅगन फ्रुट यातून आर्थिक उन्नती साधता येते. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर तरुणांनी आधुनिक शेती करावी." -विजया घुले, प्रगतशील शेतकरी
शेतात योग्य प्रकारचे पीक येण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पाण्याची गरज असते. एकही पीक असे नाही की ज्याला पाण्याची गरज नाही. परंतु, दुष्काळी भागात कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुट चे उत्पादन घेतले जात आहे. कमी खर्चात चांगला नफा या पिकातून मिळवला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार हे ड्रॅगन फ्रुट च्या लागवडीला चालना देत आहे. या पिकाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारत आहे. तालुक्यात पाऊस कमी झाल्यामुळे दरवर्षी पाण्याचे समस्या निर्माण होते. त्यामुळे अनेक शेतकरी पारंपरिक पिके सोडून ड्रॅगन फ्रुट कडे वळले आहेत.
"सफरचंद, ड्रॅगन फ्रूट शेती आपल्याकडे नव्हती; पण नवीन प्रयोग करून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. तालुक्यात ८ हेक्टर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रूटची शेती होत असून, आर्थिक फायदादेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे." - गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी
तालुक्यात बारा शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली असून, सहा वर्षांपासून अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रुटमधून उत्पन्न मिळवत आहेत.