आपल्या शिक्षणाच्या जोरावर आणि मेहनतीच्या साथीनं इगतपुरी तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने संकरित गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. रब्बी हंगामात शेतकरी लोकवन, अजय 72, अजित 102 ह्या गव्हाचे पीक घेतात, त्यातून उत्पन्न कमी मिळते. मात्र पदवीधर असणाऱ्या गोकुळ जाधव यांनी 15 एकरमध्ये संकरित जातीचा गहू केला असून हा पहिलाच प्रयोग त्यांनी इगतपुरी तालुक्यात यशस्वी केला आहे.
दरम्यान इगतपुरी तालुक्यात घरगुती बियाणे वापरून गव्हाची पेरणी केली जाते. यातून साधारण 15 क्विंटल इतके गव्हाचे उत्पन्न मिळते. मात्र संकरित गव्हाच्या प्रयोगातून एकरी 30 क्विंटल इतके उत्पन्न मिळते. आता जाधव यांनी केलेल्या संकरित गहू लागवडीतून 10 ते 12 लाखांचे उत्पन्न अपेक्षित असून अवघ्या महिनाभरात गहू काढणीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा गहू खराब होण्याची भीती नसून साठवणूक करून ठेवू शकतो. शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने वेगेवगेळ्या वाणांची लागवड करून शेतीत प्रयोग करणे आवश्यक झाले आहे. संकरित गहू शेतीला आपणही भेट द्या असे आवाहन जाधव यांनी केले आहे.
असं केलंय व्यवस्थापन
दरम्यान दाणेदार गव्हाचे फुटवे सिंगल पेरणीतून केले असून, गव्हाचे पीक 110 दिवसात येते. यासाठी त्यांनी एकरी वीस किलो बियाणे वापरले आहे. योग्य खतांचे नियोजन व फवारणी करून गव्हाचे दोन फूट इतके फुटवे झाले आहेत. फुटव्यांमधील अंतर नऊ इंच ठेवले आहे. हा आधुनिक गव्हाचा प्रयोग निफाड व सिन्नरमध्ये केला जातो. या गव्हाला पंधरा दिवसांनी पाणी दिले जाते. आता इगतपुरी तालुक्यात जाधव यांनी केल्याने काही शेतकऱ्यांनी या शेतीला भेटी दिल्या आहेत.
शेतीत नवनवीन प्रयोग
सेंद्रिय शेती करणारे शेतकरी प्रकाश विश्राम जाधव यांचा मुलगा गोकुळ जाधव याने कृषी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊनही आपल्या मातीशी नाळ घट्ट ठेवत शेतातच नव्या उमेदीने, नव्या संकल्पना घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीवर अवलंबून न राहता आपल्या शेतात अनेक नवनवीन उपक्रम केले आहेत. त्यात दहा एकरात टोकन पद्धतीने सोयाबीन पिकाची यशस्वी लागवड, सहा वर्षांपासून शेडनेटच्या माध्यमातून ढोबळी, पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी अशीही प्रयोगशील शेती करतात. कृषी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊनही आपल्या मातीशी एकरूप असलेल्या या तरुणाने शेतात अनेक नवनवीन उपक्रम केले आहेत, याची दखल कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्माने घेऊन नुकताच आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर केला आहे.