आवर्षणप्रवण तालुका म्हणून प्रचलित असलेल्या नांदगाव तालुक्यात पारंपरिक शेतीला दुग्ध व्यासायची जोड देत अर्थ पूर्ण शेती व्यवसाय करणारे देविदासराव परिसरात प्रयोगशिल म्हणून नावलौकिक मिळवत आहे.
नाशिक जिल्ह्याच्या भार्डी (ता. नांदगाव) येथील देविदास राणुबा मार्कंड यांना वडीलोपार्जित १५ एकर शेती आहे. ज्यात मका, कांदा, बाजरी, ज्वारी अशी पिके घेतली जातात. तसेच डाळिंब, शेवगा बागेचा प्रयोग देखील त्यांनी केला आहे मात्र त्यात फारसे यश न हाती लागल्याने अलीकडे पारंपरिक शेतीच मार्कंड करतात.
तर दुसरीकडे तालुक्यात मोठ्या प्रमाणात म्हशींचा दुग्ध व्यवसाय पसरलेला आहे. ज्यामुळे आपसूक आपणही दूध व्यवसाय करावा का? ही ओढ मनात येत असे ज्यातून गेल्या पाच वर्षांपासून देविदासराव दूध विक्रीच्या उद्देशाने म्हशींचे संगोपन करतात.
आज ३० म्हशी तर लहान मोठ्या पारड्या रेडे मिळून ४० जनावरे मार्कंड यांच्याकडे आहे. पैकी २२ म्हशी सध्या दुधावर असून त्यांच्यापासून दिवसाला सरासरी ११०-१२० लिटर दूध उत्पादन होते. ज्याची पुढे गावातील संकलन केंद्रावर विक्री केली जाते. ज्या दूधाला ७.०-७.५ असा फॅट लागत असून ५५-५७ असा दर मिळतो.
सकस आहार ते परिपूर्ण चारा नियोजनावर भर
मार्कंड यांनी म्हशींसाठी २.५ एकर क्षेत्रावर ३ फुट बाय १ फुट अंतरावर नेपिअर गवताची लागवड केली आहे. सोबत खरीप आणि रब्बी हंगामात उपलब्ध होणाऱ्या मका पासून मुरघास केला जातो. तर ज्वारीच्या कडब्याची कुट्टी करून साठवली जाते. ज्यातून दररोज सुका चारा हिरवा चारा व खुराक यांचे एकत्रित (टीएमआर) पद्धतीने मिश्रण करून म्हशींना वैरण दिली जाते.
आधुनिकतेचा गोठ्यात वावर
म्हशींना त्यांच्या गरजेनुसार पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे याकरिता मार्कंड यांनी गोठ्यात स्वयंचलित पाणी सुविधा केली आहे. ज्यात २४ तास पाणी उपलब्ध असते. म्हैस जितके पाणी पिणणार तितकेच पाणी पुन्हा त्यात स्वयंचलित यंत्राद्वारे भरले जाते. ज्यामुळे मोठा वेळ आणि कष्ट वाचल्याचे देखील देविदासराव सांगतात.
तसेच गोठ्यात सकाळ संध्याकाळ स्वच्छता करत असतांना जमा होणारे शेण पाणी नाळी द्वारे शेड बाहेरील एका खड्ड्यात जमा होते.ज्यात पुढे मड पंप टाकून हि स्लरी शेतात पोहचविली जाते.
शेण देई धन
अलीकडे दुधाला दर नाही मात्र दूध या एका उत्पादनाकडे आपण लक्ष दिल्याने यातील इतर फायद्यांकडे दुर्लक्ष होते. मुळात गाई म्हशींचे संगोपन करतांना त्यांच्या पासून मिळणाऱ्या शेणाचे देखील फायदे आहे. आज आमच्या शेतात रासायनिक खताचा अगदी अल्प वापर होतो आहे कारण गोठयातील स्लरी शेतात जात असल्याने बाहेरून खते देण्याची गरज भासत नाही. परिणामी दूध दर जरी कमी असले तरीही घरचा चारा-पाणी असल्याने व संपूर्ण शेतीला पुरेसा खत मिळत असल्याने आम्ही हा व्यवसाय आनंदाने करत आहोत. - देविदास राणुबा मार्कंड, रा. भार्डी ता. नांदगाव जि. नाशिक.
हेही वाचा : Sericulture Success Story : पारंपरिक शेतीला फाटा देत महेशने शोधली रेशीम शेतीतून नोकरी