Join us

Dairy Farmer Success Story : दत्तात्रयरावांची दुग्ध व्यवसायात प्रगती; ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला दिली जोरदार भरारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:15 IST

Dairy Farmer Success Story : मानसपुरी (Manaspuri) येथील शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून दर महिन्याला ५ लाख २५ हजारांचे उत्पन्न मिळविले असून त्यासोबत जनावरांचे शेणखत शेतात टाकून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही घेतले आहे.

गोविंद शिंदे 

नांदेड जिल्ह्यातील मानसपुरी येथील शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून दर महिन्याला ५ लाख २५ हजारांचे उत्पन्न मिळविले असून त्यासोबत जनावरांचे शेणखत शेतात टाकून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही घेतले आहे.

मानसपुरी येथील दत्तात्रय नारायण गोरे हे पदवीधर असूनही घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण त्यांना घेता आले नाही. नोकरीही न लागल्यामुळे व केवळ एक एकर शेती असूनही त्यांनी नोकरीचा नाद सोडून दिला. व्यावसायिक होण्याचे ध्येय बाळगून त्यांनी एका म्हशीपासून दुग्ध व्यवसाय सुरू केला.

पंधरा वर्षांमध्ये त्यांनी हा व्यवसाय २५ म्हशींपर्यंत नेला. सध्या ते दररोज अडीचशे लिटर दूध शासकीय डेअरीवर तसेच दुकानातून विक्री करतात. सध्या दररोज ते १७ हजार ५०० रूपयांचे दूध विकत असून या व्यवसायावर त्यांनी चार एकर शेती विकत घेतली आहे हेही विशेष.

दत्तात्रय गोरे (Dattatray Gore) हे मागील पंधरा वर्षापासून दुग्ध व्यवसाय करत आहेत. सध्या त्यांच्यासोबत त्यांचे दोन मुलेही शिक्षण पूर्ण करून वडिलांसोबत या दुग्ध व्यवसायात सहकार्य करीत आहेत. गोरे यांनी दुष्काळात ही जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू दिली नाही. यामुळे दोन एकर शेती जनावरांच्या खाद्यासाठी राखीव ठेवली आहे. 

२५ जाफराबादी म्हशीचे केले नियोजन

■ मानसपुरी बाचोटी शिवारात त्यांनी शेतामध्ये २५ जाफराबादी म्हशीचे नियोजन करून व्यवसाय सुरू केला आहे. शेतीसोबत जोडधंदा म्हणून त्यांनी हा मार्ग अवलंबला होता. त्यात त्यांनी यश संपादन करून दर महिन्याला पाच लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. खर्च वगळता त्यांना जवळपास तीन लाख रुपये केवळ दुग्ध व्यवसायातून उत्पन्न मिळते.

हेही वाचा : Dairy Farmer Success Story : शेतीला पशुधनाची जोड गरजेची; दूध दर कमी असतांनाही देविदासरावांची आर्थिक प्रगती

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीदूधनांदेडमराठवाडाशेती क्षेत्र