Join us

Dairy Farmer Success Story : अल्पभूधारक अनिलरावांची दुधातून अर्थक्रांती; दूध दर कमी असतांनाही मिळतोय नफा

By रविंद्र जाधव | Updated: August 20, 2024 21:15 IST

अल्पभूधारक त्यात नापिकीमुळे कर्जबाजारीपणा वाढल्याने शेती जोडधंदा म्हणून एका गाईपासून सुरू झालेल्या दूधव्यवसायाला अनिलरावांनी आज आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून दूधव्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल्याचे ही ते अभिमानाने सांगतात.

अल्पभूधारक त्यात नापिकीमुळे कर्जबाजारीपणा वाढल्याने शेती जोडधंदा म्हणून एका गाईपासून सुरू झालेल्या दूधव्यवसायाला अनिलरावांनी आज आधुनिक प्रगतीच्या वाटेवर आणले आहे. सोबतच ते यातून चांगला आर्थिक नफा मिळवीत असून दूधव्यवसायावर मुलांचे शिक्षण तसेच घर बांधल्याचेही ते अभिमानाने सांगतात.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर तालुका वैजापुर येथील अनिल बाळनाथ भोसले यांना वडीलोपार्जित १ एकर १० गुंठे शेतजमीन. कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तुर, गहू, आदी पिके ते घेत. मात्र दुष्काळी पट्टा असल्याने वारंवार नापिकीला सामोरे जाण्याची वेळ अनिल यांच्यावर आली. ज्यातून पुढे कर्जबाजारीपणा वाढला आणि आता शेतीला जोडधंदा हवा या हेतुने त्यांनी परिसरातून एका एचएफ (होल्स्टीन फ्रिजियन) गाईची खरेदी केली. 

पुढे दूध व्यवसायाचे नवनवीन तंत्र अवगत करत सोबत काही गायींची नव्याने खरेदी देखील अनिल यांनी केली. एव्हाना अनिल यांची शेती मिश्र पिकातून पूर्णपणे चारा पिकांकडे वळली होती. सोबत दूध व्यवसायाच्या या वाटेवर अनिल हळूहळू प्रगत होत होते. या सर्व वाटचालीतून आज अनिल यांच्याकडे सध्या उच्च दूध क्षमतेच्या ५ गाई असून २ कालवडी आहेत. 

मुक्त संचार गोठ्यासह आधुनिक यंत्राचा वापर

गायींचा मुक्त संचार व्हावा जेणेकरून त्या सदृढ व निरोगी रहाव्या या हेतूने अनिल यांच्याकडे सध्या अद्ययावत ४० फुट बाय ६० फुट मुक्त संचार तर ३० फुट बाय ५४ फुट बंधिस्त गोठा आहे. यासोबत हिरव्या चाऱ्याच्या कुट्टीकरिता कुट्टी मशीन, दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन, गायींना बसण्यासाठी मॅट, मच्छरांपासून बचावा करिता फॅन आदी व्यवस्था त्यांनी केली आहे हेही विशेष. 

चारा व्यवस्थापनावर भर

दूध व्यवसायात चारा नियोजन खूप गरजेचे आहे. मात्र घरची अवघी एक एकर शेती असल्याने त्यात मका पीक घेत त्यापासून केवळ मुरघास बनविला जातो. तर परिसरातील शेतकऱ्यांना मका सोंगणी करिता येणारा खर्च देत त्याबदल्यात सुका चारा म्हणून मका कुट्टी करून साठविली जाते. तसेच नेपियर गवताची लागवड केली असून त्याद्वारे हिरव्या चाऱ्याची उपलब्धता पूर्ण करत असल्याचे अनिल सांगतात. 

कमी गाईत अधिक दूध उत्पादन

अनिल सांगतात, सुरुवातीला दहा-बारा गाई असून देखील गोठ्यातून केवळ ७०-८० लीटर दूध उत्पादन व्हायचे. मात्र आता हेच दूध उत्पादन केवळ ५ गाईंपासून सुरू आहे. ज्याचे कारण म्हणजे आज घडीला दिवसाकाठी ३२ लीटर दूध देणारी गाय गोठ्यात आहे. तसेच दूध दर कमी असून देखील मी नफ्यात आहे त्याचे कारण म्हणजे उच्च दूध क्षमतेच्या गाई होय. 

दुधाच्या नफ्यावर घर, दुचाकी, मुलांचे शिक्षण

आज एक आर.सी.सी घर, दुचाकी, शेतात सिंचनाकरिता विहीर हे सर्व केवळ या दूधव्यवसायातून आलेल्या नफ्यावर झाले आहे. तर सोबत मुलांचे शिक्षण हे देखील दूधव्यवसायावर सुरू आहे. अनेकदा संकटे आली मात्र दूधव्यवसाय टिकून ठेवला,  लढण्याची जिद्द ठेवली, वेळेनुसार आधुनिक नवनवीन बदल केले ज्यातून आजची आर्थिक प्रगती ही साधता आली आहे. - अनिल भोसले, दूधव्यावसायिक शिऊर.

हेही वाचा - Poultry Success Story : कुक्कुटपालनातील खान्देशभूषण; कोंबडी पालनात 'या' पद्धतीचा वापर करत वार्षिक लाखोंची उलाढाल

टॅग्स :दुग्धव्यवसायशेतकरीशेतीगायदूधशेती क्षेत्रमराठवाडा