Join us

अल्पभूधारक अंजलीताईंच्या घरी जेव्हा गायींच्या रुपाने येतात लक्ष्मीची पावले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 5:42 PM

अल्पभूधारक कुटुंबातील सौ. अंजली मालोदे यांनी जिद्द धरली आणि गायींच्या रूपाने लक्ष्मीची पावले घरी आली आणि त्यांची परिस्थितीच पालटली.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात अवघ्या शंभर घराचं गाव असलेले पोखरी. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व काहींनी जोपासलेला पारंपरिक दुग्ध व्यवसाय. याच गावात लग्न झालं आणि सौ अंजली या मालोदे परिवारात आल्या. मात्र सासरी शेती हा एकमेव आर्थिक उत्पन्नाचे साधन असलेला व्यवसाय होता. त्यातही अल्पभूधारक परिवार, जेमतेम तीन एकर शेती. ज्यामुळे कुटुंबाची सततची होणारी हेळसांड बघता त्या पती बबन रावसाहेब मालोदे यांच्याशी नेहमी काही तरी नवीन करू म्हणत चर्चा करायच्या, हट्ट धरायच्या. एक दिवस या चर्चेतून गाय घेऊन दुधातून उत्पन्न साधण्याचे ठरले. त्या प्रमाणे बबन मालोदे यांनी एक एच एफ जातीची गाय २००९ साली खरेदी केली.

मुक्तसंचार गोठा

पुढे कालवड संगोपन करत आलेल्या उत्पनातून आणखी काही गाईंची खरेदी करत आजपावतो सौ अंजली व श्री बबन मालोदे यांच्याकडे आठ गाई व दोन कालवडी आहे. या गाईंकरिता त्यांनी ३० फूट × १०० फूट मुक्त संचार गोठा देखील उभारला असून सध्या ते अत्याधुनिक मिल्किंग मशीनच्या साहाय्याने दूध काढतात. त्यांनी गोचिडांचा प्रभाव टाळण्यासाठी चार पाच कोंबड्याचे पालन देखील केले आहे.

आता तीन गाई या गाभण असून सध्या दुधाला पाच गायी सुरु आहे. या पाच गाईंचे मिळून दोन्ही वेळेचे ८० लिटर दुध ते डेअरीला घालतात. त्यांच्या दुधाला ३४ ते ३५ रुपये प्रतीलिटर असा फॅट नुसार दर मिळतो. पहाटे ५ पासून हे जोडपे शेण उचलणे, दूध काढणे, खुराक देणे, वैरण देणे असे कामे करतात व नंतर बबन मालोदे हे दूध पोहचवायचं काम करतात तर सौ अंजली या गावातीलच अंगणवाडीत मदतनीस म्हणून आपल्या कामावर जातात. त्यानंतर बबन मालोदे हे दिवसभर शेती बघतात, ज्यात दुपारनंतर सौ अंजली त्यांना मदत करतात व सायंकाळी पुन्हा ५.३० पासून हे जोडपे दूध काढणे वैरण देणे आदी कामात व्यस्त होतात.

चारा व्यवस्थापन

अर्धा एकर शेतात गाईंच्या वैरणीसाठी नेपिअर ची लागवड करण्यात आली आहे. उरलेल्या अडीच एकर क्षेत्रात मका आहे यापासून पुढे मुरघास केला जातो आणि उन्हाळी रब्बी हंगामात ज्वारी किंवा बाजरी हे चारा पीक घेऊन त्याची कुट्टी करून ती वर्षभर सुका चारा म्हणून गाईंना देण्यात येतो. अशा प्रकारे नेपिअर कुट्टी, मुरघास आणि सुका चारा कुट्टी आदींची दोन वेळेस वैरण मालोदे हे आपल्या गाईंना देतात. गोठ्यातील शेण ते आपल्या शेतातच शेणखत म्हणून वापरत असल्याने चारा पिकांना त्यांचा फायदा होत असल्याचे मालोदे सांगतात.

श्री बबन रावसाहेब मालोदे यांचा रेशीम प्रकल्प

आरोग्य व्यवस्थापन व माहिती संकलन

मालोदे यांच्या गोठ्यावरील सर्व गाईंना त्यांनी लाळ्या खुरकृत, लंम्पी, ब्रुसोलिसिस आदींच्या लसी दिल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक पशुधन पर्यवेक्षक असलेले डॉ भगवान कवाडे यांच्या मदतीने ते आधुनिक सीमेन त्यांच्या गाईंना भरवतात ज्याची पूर्ण माहितीही बबन मालोदे यांनी साठवलेली आहे हे विशेष.

 रेशीम उद्योगाची जोड

बबन मालोदे यांनी २०१९ पासून दुग्ध व्यवसाय व शेतीला जोड म्हणून आपल्या घराच्या बाजूला कमी खर्चात २० फूट बाय ५० फूट आकाराचा एक शेड करत त्यात रेशीम शेतीला सुरुवात केली आहे. ज्याकरिता त्यांनी अर्धा एकर क्षेत्रात तुती ची लागवड केली आहे. वार्षिक तीन ते चार बॅच ते या रेशीम च्या घेतात सरासरी एक बॅच एक लाख ते दीड लाख उत्पन्न यातून ते मिळवतात. जालना येथील रेशीम बाजारात जाऊन ते या रेशीम कोषांची विक्री करतात व तेथूनच ते रेशीम अंडीकोषची खरेदी करत पुन्हा नवीन बॅच घेतात.

-  रविंद्र शिऊरकर

टॅग्स :दुग्धव्यवसायदूधशेती