भारत सरकार मार्फत देण्यात येणारा आणि पशुसंवर्धन क्षेत्रातील सर्वोच्च असा राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार - २०२३ या पुरस्कारसाठी राज्यातील एकमेव नाशिक येथील इंडिजिनस फार्मचे प्रवर्तक, सटाणा येथील प्रगतशील शेतकरी अभियंता राहुल मनोहर खैरनार यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारामुळे यंदा महाराष्ट्र राज्यातील राहुल खैरनार हे एकमेव गोपालक ठरले आहेत. देशी गौसंवर्धन क्षेत्रासाठी देण्यात येणारा पुरस्कार यंदा गुजरात आणि महाराष्ट्रातील गोपालकांना मिळाले असून दोन लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. श्री खैरनार यांच्या इंडिजीनस फार्म मध्ये 80 देशी गीर गायी आहेत. संपूर्ण भारतातुन दरवर्षी देशी गोवंश मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन जणांना सदर पुरस्कार भारत सरकार कडून प्रदान करण्यात येतो.
राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्काराचे उद्या वितरण, महाराष्ट्रातून या शेतकऱ्याचा समावेश
राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कार 2023 केंद्रीय मंत्री पुरुषोत्तमजी रुपाला, पशुसंवर्धन विभाग, भारत सरकार यांच्या हस्ते देण्यात आला आहे. यावेळी आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमांता बिसवा सरमा , केंद्रीय राज्यमंत्री संजीवकुमार बालियान, पशुसंवर्धन भारत सरकार तसेच आसाम राज्यातील मंत्रिमंडळ यांची उपस्थिती होती. गुवाहाटी, आसाम येथे आज दि. २६ रोजी प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल राहुल खैरनार यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत." हा पुरस्कार वैयक्तिक माझा नसून देशी गोसवर्धन करणाऱ्या भारतातील सर्व गोपालकांसाठी व त्यांच्या कार्यासाठी समर्पित आहे." असे राहुल खैरनार म्हणाले.
भारतातील देशी गोवंशाच्या जाती मजबूत आहेत. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची अनुवांशिक क्षमता त्यांच्याकडे आहे. स्थानिक जातींच्या विकास आणि संवर्धनावर विशिष्ट कार्यक्रम नसताना, त्यांची लोकसंख्या कमी होत चालली आहे आणि त्यांची कामगिरी सध्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे. अशाप्रकारे मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या अंतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने, देशी गोवंश जातींचे संवर्धन आणि विकास करण्याच्या उद्देशाने डिसेंबर 2014 मध्ये राष्ट्रीय गोकुळ मिशन, गोवंश प्रजनन आणि दुग्ध विकास कार्यक्रमांतर्गत सुरू केले होते.