Join us

बाभुळगाव येथील शेतकरी दीपक गुरगुडे पाच एकर डाळिंब शेतीतून झाले कोट्याधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 8:44 AM

निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून ७१ टन २०० किलो उत्पादन घेत, १ कोटी २३ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.

नव्या युगाच्या अस्सल शेतकऱ्याच्या नजरेतून विषम वातावरणातील प्रतिकूल बदलांचा वेध घेत, आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेणाऱ्या बाभुळगाव येथील दीपक गुरगुडे या तरुण शेतकऱ्याने या वर्षी पाच एकर डाळिंब शेतीतून ७१ टन २०० किलो उत्पादन घेत, १ कोटी २३ लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. यंदाच्या वर्षी त्यांची डाळिंबे बांगलादेशासह दुबईला पोहोचली आहेत.

दीपक गुरगुडे हे गेल्या पाच ते सात वर्षांपासून बाभुळगाव येथील आपल्या शेतजमिनीपैकी पाच एकर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेत आहेत. अनुकूल वातावरणाचा सहज फायदा घेण्याबरोबरच प्रतिकूल वातावरण, आपल्या बुद्धिचातुर्य व अथक परिश्रमातून अनुकूल करून घेत, शेती करण्यात त्यांचा हातखंडा आहे. 'लोकमत'शी बोलताना दीपक गुरगुडे म्हणाले की, मुळातच डाळिंब हे उष्ण कटिबंधातील कमी पाण्यावर येणारे पीक आहे. त्याची पाण्याची गरज पाहता योग्य नियोजन केले तर ते शेतकऱ्यांना दुष्काळातून तारून नेणारे पीक ठरू शकते. या पिकालाठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे योग्य ठरते. सेटिंगमध्ये काळात या पिकाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

आपण इस्त्रायल पद्धतीने डाळिंबाची शेती करत आहोत. सघन पद्धतीने लागवड केली आहे. पाच एकरात ३ हजार ४०० झाडे आहेत. औषध फवारणीसाठी जपानी पद्धतीच्या स्प्रेइंग मशीनचा वापर करण्यात येत आहे, असे ही गुरगुडे यांनी स्पष्ट केले.तरुण शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती न करता आधुनिक पद्धतीने करावी. तिच्याकडे व्यवसाय म्हणून लक्ष केंद्रित करावे. शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्राची प्रत तपासणे अत्यंत आवश्यक आहे. सलग चार वर्षे डाळिंबाचे उत्कृष्ट घेतल्याने, दौंड येथे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या दौंड कृषी महोत्सव २०१३ मध्ये कृषिभूषण सन्मान देऊन दीपक गुरगुडे यांना सन्मानित करण्यात आले होते.

यंदा कमी पावसाचा बसला फटका- गेल्या दोन तीन वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील शेती वातावरणातील बदलांपुढे हात टेकताना दिसते आहे, भरीत भर म्हणून यंदाच्या वर्षी पाऊसही जेमतेम झाला आहे.- आधीच्या व आत्ताच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे डगमगून न जाता गुरगुडे यांनी उत्तम प्रकारचे डाळिंबाचे पीक घेतलेले आहे.- पाठीमागील चार वर्षांपासून त्यांचे डाळिंब बांगलादेशमध्ये निर्यात होत होते. यंदा बांगलादेश बरोबरच दुबई व भारतातील दिल्ली ते पोहोचले आहे.

टॅग्स :शेतकरीशेतीफळेदुबईपाऊसइस्रायलपीक