Join us

सचिनच्या जिद्दीला नाही तोड; अपार कष्टाने पिकविलेला पेरू दुबईत झाला गोड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 4:11 PM

बुवाचे वाठार येथील युवा शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी खडकाळ माळरानात जिद्दीने अपार कष्टाने पिकविलेला पेरू आता दुबईच्या बाजारपेठेत विक्री साठी गेला आहे.अधिकचा दर मिळू लागल्याने त्यांची पेरू शेती फायद्यात आली आहे.

खोची: बुवाचे वाठार येथील युवा शेतकरी सचिन अशोक पाटील यांनी खडकाळ माळरानात जिद्दीने अपार कष्टाने पिकविलेला पेरू आता दुबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी गेला आहे. अधिकचा दर मिळू लागल्याने त्यांची पेरू शेती फायद्यात आली आहे.

आमदार राजू आवळे यांनी पेरू शेतीस भेट देवून नावीन्यपूर्ण उपक्रमशील शेतीचे कौतुक केले.त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर, बेळगाव तसेच परदेशात पेरू पाठविण्यात आला. तीनशे पासून सातशे ग्रॅम वजनाचे मोठे पेरू गोलाकार आकाराचे आहेत.

त्यामध्ये बियाणे कमी असून गाभा जास्त आहे. गोड स्वादिष्ट असल्याने मागणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चार महिने झाले चालू वर्षीचे उत्पादन सुरू आहे. दोन एकरात व्हीएनआर जातीची पेरूची बाग असून आता पर्यंत सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पादन निघाले आहे. अजून महिनाभर उत्पादन सुरू राहील.

विक्रीचे पैसे बारा दिवसात मिळतात. पावणेतीन लाख रुपयांचा खर्च या शेतीसाठी झाला आहे. शेतीचे नियोजन करेक्ट केल्याने शेती फायद्यात आली आहे अशी माहिती शेतकरी सचिन पाटील यांनी दिली.

पारंपरिक शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग शेती केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते. शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण प्रयोग शेतीत  केले पाहिजेत असे मत आमदार राजू आवळे यांनी व्यक्त केले.

माळरानात ऊस पीक जास्त पाणी खाते. ऊसाच्या खोडव्याच्या उत्पन्नातही कमलीची घट होते. त्यामुळे फळबाग लागवडीचा विचार केला. त्यानुसार कमी पाण्यावर येणारी पेरू ची बाग केली. दोन एकरात बारा बाय आठ फूट अंतरावर ९०० रोपं लावली. रोपांची वाढ चांगली येण्यासाठी खड्डे खोदून शेणखत घातले. तसेच रासायनिक खतांच्या मात्राही दिल्या. ठिबकद्वारे पाण्याची सोय केली. झाडास वजनाने जास्त असणारे पेरू मोठ्या प्रमाणात लागले. जास्त दर मिळाल्याने दुबई येथे विक्रीसाठी पेरू पाठविला अशी सचिन पाटील यांनी माहिती दिली.

अधिक वाचा: चार हजार फुटांवरून पाणी आणून दुष्काळी गावात फुलवली मिरचीची शेती

टॅग्स :शेतकरीशेतीफळेफलोत्पादनपीक व्यवस्थापनपीकदुबईऊस