Dragon Fruit :
फकिरा देशमुख :
भोकरदन : तालुक्यातील वालसावंगी येथील उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने ड्रॅगन फ्रूटच्या एक एकर शेतीतून १५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. तसेच ४ एकर क्षेत्रावर जेम्बो रेड ड्रॅगनफळांची लागवड केली आहे.
या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीतून स्वयंरोजगाराच्या संधी शोधत नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे. वालसावंगी येथील तरुण शेतकरी तुषार उपोळकर यांनी फुलवलेली ड्रॅगन फळाची शेती.
२०२२ मध्ये भोकरदन वालसावंगी गावातील बाळू आहेर, बाळू उपोळकर, लक्ष्मण सपकाळ, तुषार सपकाळ, किरण तबडे, अनिल वाघ, लक्ष्मण सपकाळ या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ड्रॅगन फळाची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील ड्रॅगन फळांच्या शेतीला भेट दिली. वालसावंगी येथील ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा निर्णय घेतला व तत्काळ सर्वांनी २५ रुपये भावाने रोपांची बुकिंग केली. बीएससीचे शिक्षण पूर्ण केलेले तुषार बाळू उपोळकर या तरुणाने १० बाय ६ अंतरावर रोपांची लागवड केली. तसेच दाणेदार खताचा वापर केला. २०२३ मध्ये त्यांना एक एकरात ६० क्विंटल उत्पादन निघाले. १३० रुपये किलोने फळाची विक्री केली. या फळाला मागणी असल्याने उपोळकर परिवाराने यंदा साडेचार एकर क्षेत्रापैकी साडेतीन एकरमध्ये रोपांची लागवड केली आहे. अडीच एकरमध्ये टेलिस पद्धतीने लागवड केली. त्यामुळे एका एकरात ४ हजार रोपे लागली आहे. जुनी बाग ही १० बाय ६ अंतर असल्याने एका एकरात २ हजार ४५० हजार रोपे लागलेली आहेत.
नवीन पद्धतीने केलेल्या लागवडीत एका एकरमध्ये १ हजार रोपे अधिक लागली असल्याने उत्पन्नात वाढ होणार आहे. या प्रयोगाची पाहणी करण्यासाठी परिसरातील शेतकरीही येताना दिसतात.
१७० क्विंटल उत्पन्न दर
• तुषार उपोळकर यांनी यावर्षी जून महिन्यापासून फळांचे हार्वेस्टिंग सुरू केले आहे. यंदा ड्रॅगन फळाला १०० ते १३० रुपये किलोचा दर मिळाला आहे.
• एका एकरात आतापर्यंत १७० क्विंटल फळांचे उत्पादन निघाले आहे. खर्च वजा करता त्यांना १६ लाख रुपयांचे उत्पन्न निघाले असल्याचे तुषार उपोळकर यांनी सांगितले.
फळ खरेदीसाठी व्यापारी बांधावर
वालसावंगी येथे २०२२ मध्ये आठ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ड्रॅगन फळाची लागवड केली होती. त्यामुळे गावात एकत्र उत्पादन झाले आहे. येथे रायपूर, छत्तीसगड, सुरत येथील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन ड्रॅगन फळ विकत घेत आहेत. गावातील अनेक शेतकऱ्यांनी ड्रॅगन फळाची लागवड केली आहे. - तुषार उपोळकर, शेतकरी, वालसावंगी.